राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुण्यात ४४ ठिकाणी शानदार संचलन
By admin | Published: October 11, 2016 04:53 PM2016-10-11T16:53:39+5:302016-10-11T16:53:39+5:30
विजयादशमीच्या मुहुर्तावर समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात ४४ ठिकाणी शानदार संचलन करण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 - विजयादशमीच्या मुहुर्तावर समाजामध्ये विजयाकांक्षा जागविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात ४४ ठिकाणी शानदार संचलन करण्यात आले. फूलपँट परिधान केलेले शेकडो शिस्तबध्द स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार आजपासून देशभर स्वयंसेवकांना हाफपँटऐवजी फूलपँट वापरण्याची मुभा देण्यात आली.
नागरिकांनी ठिकठिकाणी या संचलनाचे स्वागत केले. स्वयंसेवकांनी पांढरा शर्ट, खाकी रंगाची फूलपँट, लोकरीच्या काळ्या टोप्या असा गणवेष परिधान केला होता. घोषपथकाच्या वादनाच्या तालावर शिस्तबध्द पावले टाकणा-या या स्वयंसेवकांना पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. झेंडुच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली.
कसबा भागात सकाळी ७ वाजता आरसीएम गुजराती हायस्कूल व गणेश पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिर प्रांगण, साडेसात वाजता पुणे विद्यार्थी गृह, सव्वाआठ वाजता भवानी पेठेतील बालाजी पूरम आणि सायंकाळी 6 वाजता कोरेगाव पार्क भागात कवडेवाडी येथे संचलन झाले.
मोतीबाग मुख्यालयाच्या संचलनात बाल तरुण आणि प्रौढ यांची एकाच मैदानावरुन तीन वेगवेगळ्या ठिकाणी संचलने झाली. सुभाषनगर, बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ या मार्गाने फिरुन संचलन पुन्हा पुणे विद्यार्थी गृहात आले. तेथे प्रार्थना होऊन संचलन पूर्ण झाले.
संघाच्या प्रांत प्रचार मंडळाचे सदस्य निखिल वाळिंबे म्हणाले, राजस्थानमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत हााफपँटऐवजी फूलपॅट वापरात आणण्याचा निर्णय झाला होता. देशभरातील संघ स्वयंसेवकांची संख्या लक्षात घेता त्यांना पुरेशा प्रमाणात पँट्सची उपलब्धता व्हावी यासाठी काही महिन्यांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला होता.
वाळिंबे म्हणाले संघाने संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या काळापासूनच आवश्यकतेनुसार वेळोवेळी गणवेषात बदल केले आहेत. त्यांच्यावेळी खाकी फेटे होते. खांद्यावर आरएसएस असे लिहिलेले बॅज होते.त्यानंतर बदल करुन सुटसुटीत शर्ट, हाफपँट हा गणवेष झाला. हाफपँट वरुन फूलपँट असा बदल आज जरी आपल्याला माहिती असला तरी चार वर्षांपूर्वी संघाने पट्टयामध्ये बदल केला.
सुमित सोनवणे म्हणाले, मी बालपणापासून स्वयंसेवक आहे. गेली अनेक वर्ष संचलनामध्ये सहभागी होतो. मोतीबाग नगराचा शारिरीक शिक्षण प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे.सूर्यनमस्कार, व्यायामाचे अनेक प्रकार, खेळ, शारिरिक प्रात्यक्षिके, दंड धरायचा कसा, फिरवायचा, चालवायचा, त्याचा स्वसंरक्षण म्हणून वापर कसा करायचा हे शिकवले जाते. या वर्षी फूलपँटचा वापर सुरु झाल्याने वेगळा बदल चांगला वाटला.