खड्ड्यांविरोधात पालिकेवर मोर्चा
By Admin | Published: July 22, 2016 01:59 AM2016-07-22T01:59:42+5:302016-07-22T01:59:42+5:30
पनवेल शहरातील खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात अनोखे आंदोलन केले होते.
पनवेल : पनवेल शहरातील खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात अनोखे आंदोलन केले होते. नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात तसेच शहरातील खराब रस्ते व नाले यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात पनवेल काँग्रेसने धडक मोर्चाचे आयोजन केले होते.
पनवेल नगर परिषदेच्या हद्दीत बहुतांशी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे तर काही कामे अनेक दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहेत. वर्षभरापूर्वी बनवलेल्या अंतर्गत रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. गार्डन हॉटेल ते गोखले हॉल, साईनगर उपवन ते पाण्याची टाकी, महाराष्ट्र बँक शनिमंदिर ते कोळीवाडा, एमटीएनएल, गावदेवी मंदिर ते बस स्थानक, काळण समाज हॉल,ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात नाही तर किमान गणेशोत्सवापूर्वी तरी हे खड्डे बुजवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
खड्ड्यात पाणी भरल्याने अंदाज चुकून वाहनांचे अपघात होत आहेत. शहरातील ड्रेनेज सिस्टीम पूर्णत: निकामी झाल्याने दूषित पाणी रस्त्यावर येत आहे. ड्रेनेजच्या कामात गैरव्यवहार झाला असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे. (वार्ताहर)