शहरातील तलावांची सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: July 15, 2017 02:31 AM2017-07-15T02:31:15+5:302017-07-15T02:31:15+5:30
अग्रोळी येथील तलावात बुडून गुरुवारी दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाला
प्राची सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अग्रोळी येथील तलावात बुडून गुरुवारी दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आहेत की नाही, याची शहानिशा प्रशासनाकडून केली जात नाही.
शहरातील २४ तलावांवर महापालिकेने सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, अनेकदा हे सुरक्षारक्षक जागेवरच नसल्याचे पाहायला मिळते. तलावालगत असलेल्या उद्यानात रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा जमतो. सुरक्षेच्या दृष्टीने तलाव परिसर धोकादायक असून याठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार घडतात. त्यामुळे सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना आधी मद्याच्या बाटल्या, फोडलेल्या काचा उचलाव्या लागतात. फुटलेल्या बाटल्या उचलताना अनेकदा सफाई कामगारांना इजाही होते.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस तलाव परिसरातील सुरक्षा धोक्यात येत असून परिसरात नागरिकांना असुरक्षित वाटते. नवी मुंबई परिसरात अग्रोळी, बेलापूर गाव, दारावे, करावे, किल्ले गावठाण, नेरुळ सेक्टर २०, शिरवणे, जुहूगाव, कोपरी, वाशीगाव, सानपाडा, तुर्भेगाव, खैरणे, कोपरखैरणे, महापे, सावलीगाव, गोठीवली, गुलनाली, राबाडा, तळवली, ऐरोली नाका, दिवा, बोरोला, खोकड अशा २४ तलावांचा समावेश आहे.
तलावांचे सुशोभीकरण केल्यापासून या ठिकाणी वावर वाढला असून सुरक्षेच्या बाबतीत मात्र ठोस उपाययोजना राबविण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे. पावसाळ््याच्या दिवसात या ठिकाणी तरुणवर्ग मोठ्या संख्येने पोहण्यासाठी येत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या ठिकाणी पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे मात्र गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. सुरक्षारक्षकांची नेमणूक केली असूनही हे सुरक्षारक्षक जागेवर नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.
या मार्गातील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्तीकडे देखील कानाडोळा केला जात असल्याने अंधाराचा फायदा घेत अनेक गैरप्रकार होतात.
>पालिकेचे तलाव व्हिजन कुचकामी
तलाव व्हिजनअंतर्गत तलावातील गाळ काढणे, गॅबीयन वॉल बांधणे, गणेश विसर्जनाकरिता वेगळा भाग, घाट बांधणे, निर्माल्य कुंड उभारणे, धोबी घाट बांधणे, दगडाच्या ग्रील्स लावणे, आसनव्यवस्था आदी कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, ही काम पूर्ण झाल्यानंतर वर्ष उलटताच या ठिकाणी प्रशासनाचा चालढकलपणा समोर आला आहे.
तलावाच्या सुरक्षेचा प्रश्नावर वारंवार प्रशासनाकडे मागणी केल्यानंतर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या सुरक्षारक्षकांवर, त्यांच्या रोजच्या कामाकडे मात्र प्रशासकाचा उदासीन कारभार गुरुवारी झालेल्या घटनेमुळे समोर आला आहे. तलावाबरोबरच तलाव परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
- सरोज पाटील, नगरसेविका
>तलाव परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर
तलाव परिसरात रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून तलावाचे सुशोभीकरण केले असले तरी सुरक्षेअभावी या ठिकाणचे रूप पालटले आहे. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी वावरणाऱ्या गर्दुल्ल्यांना हटविण्याचा प्रयत्न केला असता ते दादागिरी करत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
>बेलापूर व घणसोली भागात अनुक्रमे ५ व ४ अशी सर्वाधिक तलावांची संख्या असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे २५ ते २८ टक्के क्षेत्र बेलापूर आणि घणसोली भागात व्यापले आहे.