‘सीईटी’चा कारभार रामभरोसे; दोन हजार विद्यार्थी ‘विधी’ अभ्यासक्रमास मुकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:13 AM2018-08-24T02:13:10+5:302018-08-24T06:51:37+5:30
राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे (सीईटी) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हे अमेरिकेला गेले असून त्यांचा पदभार माणिक गुरसळ यांच्याकडे देण्यात आला.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे (सीईटी) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हे अमेरिकेला गेले असून त्यांचा पदभार माणिक
गुरसळ यांच्याकडे देण्यात आला. पण त्यांच्या आर्इंचे निधन झाल्यामुळे तेही रजेवर गेल्याने दौलत देसाई या अधिकाऱ्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र देसाई आपल्याकडे ‘तात्पुरता’ पदभार असल्याचे सांगत कोणताही निर्णय घेण्यास धजावत नाहीत.
सीईटी सेल आणि ही प्रक्रिया राबविणारी एमकेसीलने घातलेला हा घोळ विद्यार्थ्यांच्या जीवाशी बेतणारा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
कोणत्याही प्रवेश परिक्षेत इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज कधीही बाद होत नाहीत. मुळात एखाद्या प्रवेश परिक्षेच्या शेवटी विद्यार्थ्यांची गुणवत्ता हाच त्याचा प्रवेशाचा निकष असला पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेजचा पर्याय दिले नाही तर त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला जे महाविद्यालय उपलब्ध होईल त्यात प्रवेश देण्याची तरतूद असली पाहिजे. मात्र या संपूर्ण प्रकरणात गुणवत्ता डावलून केवळ पर्याय दिले नाहीत म्हणून हजारो विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेशापासून वंचित ठेवले आहे, यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर आपल्याला तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.
विधी अभ्यासक्रमास २ हजार विद्यार्थी मुकणार
सदोष प्रवेशप्रक्रियेमुळे सुमारे दोन हजार विद्यार्थी विधीच्या पदवी अभ्यासक्रमास मुकणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा वैद्यकीय, इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी मूळ अर्जामध्येच पर्याय मागितले जातात. ही सर्वमान्य पध्दती असताना विधी प्रवेशाच्या बाबतीत मात्र प्रवेशाकरिता एक अर्ज आणि कॉलेज निवडीसाठी दुसरा अर्ज अशी व्यवस्था करण्यात आली. ज्यांनी पर्याय दिले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रोव्हीजनल मेरिट लिस्टमध्ये बाद ठरविण्यात आले आहेत.