राम गणेश गडकरींचा पुतळा हटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 05:46 AM2017-01-04T05:46:09+5:302017-01-04T05:46:09+5:30

‘राजसंन्यास’ या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगत, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा

Ram Ganesh demolished the statue of Gadkari | राम गणेश गडकरींचा पुतळा हटविला

राम गणेश गडकरींचा पुतळा हटविला

googlenewsNext

पुणे : ‘राजसंन्यास’ या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी झाल्याचे सांगत, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला आणि मुठा नदीपात्रामध्ये फेकून दिला. मंगळवारी भल्या पहाटे ही गोष्ट वाऱ्यासारखी पसल्यानंतर, सर्वच क्षेत्रातून तीव्र निषेध करण्यात आला.
या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध चोरी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (२३, रा. बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (२४, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी), गणेश देवीदास कारले (२६, रा. चांदुस, ता. खेड) अशी अटक कार्यक र्त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातामध्ये कुऱ्हाड आणि हातोडे घेतलेले चार तरुण मंगळवारी मध्यरात्री १.५० वाजता उद्यानामध्ये घुसले. त्यांनी पुतळ्यावर कुऱ्हाड आणि हातोड्याने घाव घातले. हा पुतळा खाली पाडल्यानंतर दोघांनी उचलून उद्यानाच्या पाठीमागूनच वाहात असलेल्या मुठेच्या पात्रामध्ये नेऊन टाकला. हा सर्व प्रकार अगदी दोन मिनिटांत आटोपला. त्यानंतर, पसार झालेल्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांंची बदनामी करणाऱ्या गडकरींचा पुतळा फोडला असून हा पुतळा गटारगंगेत टाकून दिला,असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपसह सोशल मिडीयावर व्हायरल केला. या मेसेजमध्ये अटक केलेल्या चौघांची नावे होती. तसेच स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होणार असल्याचेही म्हटले होते. पुतळ्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कारंज्याजवळील इमारतीमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत. यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. याप्रकरणी उद्यान प्रमुख अशोक दिगंबर घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.
पुतळा हलवल्याचा दावा केलेल्या तरुणांनी मात्र, आपला संभाजी ब्रिगेडशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. स्वप्निल काळे आणि गणेश कार्ले यांनी आ. नीतेश राणेंच्या भाषणापासून प्रेरीत होऊन हे कृत्य केल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर संभाजी ब्रिगेडने सावध भूमिका घेत ही वैचारिक लढाई असून श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही विचारांवर काम करीत असून सर्वच कार्यकर्त्यांचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)

राजसंन्यास या
नाटकामधून राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. त्यांनी महाराजांना बदफैली, व्यसनी अशी बिरुदे लावली आहेत. आम्ही गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेकडे हा पुतळा काढून घेण्यासंदर्भात पाठपुरावा करीत आहोत. परंतु, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा स्वत:हून बाजुला केला.
- संतोष शिंदे,
(कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे)


पुन्हा उभारणार पुतळा
- नाट्य परिषदेच्या सर्व सभासदांनी दुपारी दीडच्या सुमारास संभाजी उद्यानात एकत्र जमून या घटनेचा निषेध केला. महापौर प्रशांत जगताप यांनी घटनेचा निषेध करून पुतळा पुन्हा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

- संभाजी उद्यानामध्ये २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते पुतळा बसवण्यात आला होता. चौथऱ्यावर गडकरींच्या ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’ आणि ‘राजसंन्यास’ या नाटकांची नावे कोरलेला ताम्रपट आहे.

Web Title: Ram Ganesh demolished the statue of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.