हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:48 PM2020-01-23T14:48:09+5:302020-01-23T14:53:43+5:30
शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या याच अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
कदम म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असून ही चांगली गोष्ट आहे. तसं तर ते अडीच महिन्यापूर्वीचं जाणार होते. मात्र शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचं अयोध्या दौऱ्याचं टाईमिंग खूप महत्वाचे आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली, सावरकरांवरील त्यांचे प्रेम कमी झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे अपमान केल्यानंतर सुद्धा त्यांनी माफी मागीतीली नाही, अशा चर्चा जेव्हा होऊ लागल्या त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला श्रीराम यांची आठवण येत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.
#अयोध्येला#प्रभुरामचंद्राच्या दर्शनला जरूर जा .. परन्तु जाण्याची घोषणेचे टाइमिंग फार महत्वाचे .. @OfficeofUTpic.twitter.com/D6wV2QmGAu
— Ram Kadam (@ramkadam) January 22, 2020
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी घेत असलेल्या अधिवेशनातून हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच शिवसेनेला श्रीराम यांची आठवण आली असल्याचा खोचक टोला कदम यांनी शिवसेनेला लगावला.