"महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता?"; प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:02 AM2024-06-16T11:02:52+5:302024-06-16T11:03:11+5:30

सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.

Ram Kadam response to MP Praniti Shinde allegations plot by BJP members to create communal riots in Solapur | "महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता?"; प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रत्युत्तर

"महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता?"; प्रणिती शिंदेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर भाजपचे प्रत्युत्तर

Praniti Shinde Allegations :सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असताना मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपच्या टीमकडून सोलापुरात जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता, असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये दंगली घडवायला सांगितलं होतं, असंही प्रणिती शिंदेंनी म्हटलं. त्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय.

शनिवारी दुपारी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा जुळे सोलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. "अतिरेकी आणि भाजपावाल्यांमध्ये काहीच फरक नाही. सोलापूरची लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटली आहे, हे फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांचा माहिती होतं. म्हणूनच मतदानाच्या दोन दिवस अगोदर जातीय दंगल घडविण्याचा त्यांचा डाव होता. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे रक्ताने राजकारण करतात ही लोकं! गावागावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे.भाजपच्या संबंधित नेत्यांनी मतदानाच्या पाच दिवस अगोदरची निवडणूक प्रचारात केलेली भाषणे काढून पाहा. त्यांच्या हालचालीही तशाच होत्या. यातून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो.मात्र जनतेनं निवडणूक हाती घेतली आणि लोकशाहीचा विजय झाला," असे प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. भाजप आमदार राम कदम यांनी एक व्हिडीओ जारी करत प्रणिती शिंदेंना तुम्ही एक महिना यासंदर्भात शांत का होता असा सवाल केला. "संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची ओळख एक देवमाणूस म्हणून आहे. प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्याच्या शुभेच्छा त्यांना. पण महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता? निवडणूक पूर्ण होऊन आता महिना होत आला. जर तुमच्या आरोपात काही तथ्य आहे तर तुम्ही का गप्प बसलात?" असा सवाल राम कदम यांनी केला.

दुसरीकडे,  भाजपचे आमदार तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रणिती शिंदेंवर पलटवार केला आहे. "प्रणिती शिंदे या आता खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी आता विकासाच्या मुद्यावर बोलावे. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि सुसंस्कृत नेते आहेत, त्यांच्यावर अशी खोटी टीका करू नये. प्रणिती शिंदे प्रत्येकवेळी अतिरेकी अतिरेकी का करतात? सोलापुरात ज्या ज्या वेळी दंगल झाली त्या त्या वेळी कोणाची सत्ता होती?," असे सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटलं.
 

Web Title: Ram Kadam response to MP Praniti Shinde allegations plot by BJP members to create communal riots in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.