"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं"; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:35 PM2024-01-22T14:35:39+5:302024-01-22T14:36:31+5:30
संपूर्ण मंत्रिमंडळासोबत अयोध्येत रामललाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सांगितले
Ayodhya Ram Mandir Pranpratishtha : रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हे फक्त माझेच नव्हे तर तमाम रामभक्तांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि करोडो रामभक्तांचे स्वप्न होते की अयोध्येत राम मंदिर व्हावे आणि त्यात रामलला विराजमान व्हावेत. भव्य दिव्य राममंदिर उभे राहिले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आजचं निमंत्रण खरं तर मलाही होतं. मात्र एकट्याने दर्शन घेण्याऐवजी अख्खं मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार आहे. महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामललाशी एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेले. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. काही लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं; अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांवर जोरदार टीका केली.
बहिष्कार टाकणाऱ्यांना सद्बुद्धी मिळू दे!
"जे लोक रामाचे नाहीत, ते कामाचे नाहीत. ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो. काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. सर्वांनी या सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. पण काही लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, 'जो राम के नहीं, वो काम के नहीं", असे ते म्हणाले.
दरम्यान, गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली, संघर्ष केला, तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.