२२ जानेवारीला राज्यात दारू आणि मासबंदी करावी; भाजपा आमदाराचं CM शिंदेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 08:29 AM2024-01-04T08:29:46+5:302024-01-04T08:30:29+5:30
संपूर्ण हिंदुस्थानात या पवित्र दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे असं राम कदम यांनी सांगितले.
मुंबई - देशभरात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आहे तर राज्यात प्रभू राम शाकाहारी की मांसाहारी यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम मांसाहारी आहे असं विधान केले. त्यानंतर या विधानावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आव्हाडांना टार्गेट केले. त्यात आता भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून २२ जानेवारी २०२४ ला राज्यात दारु आणि मासबंदी करावी अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.
आमदार राम कदम यांनी पत्रात म्हटलंय की, जवळपास ५०० वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात आले आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक कार सेवकांनी यातना भोगल्या आहेत. प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या पवित्र दिवसाला एखाद्या सणाचे महत्त्व आले आहे असं त्यांनी सांगितले.
त्यासाठी आपण २२ जानेवारी या पवित्र दिवसाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारू आणि मास बंदी करण्यात यावी. तसेच केंद्र सरकारलाही २२ जानेवारी या दिवसाकरिता संपूर्ण देशभरात दारू आणि मास बंदी व्हावी याकरिता महाराष्ट्र सरकारच्यावतीने विनंती करण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
माननीय ना. श्री. एकनाथ शिंदेजी @
— Ram Kadam (@ramkadam) January 3, 2024
अयोध्येत होणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पवित्र दिवसाचे महत्व लक्षात घेता त्यादिवशी महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी याबाबत.... तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला… pic.twitter.com/e0JB5qZrUo
जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरून भाजपा संतप्त
जितुद्दीन आव्हाडांना आज चक्क प्रभू रामचंद्र आठवले. जसे आचार तसे विचार त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं दिसतो. यांना हिंदू दैवतांचा अपमान करण्यात काय धन्यता वाटते माहीत नाही. खोटा आणि सोयीचा इतिहास लिहण्याची तुम्हा लोकांची जुनी खोड रामभक्त सहन करणार नाहीत. लक्षात ठेवा वाल्यानं रामायण लिहलं नव्हतं त्यासाठी त्याला वाल्मिकी व्हावंच लागलं होतं असं सांगत भाजपानं जितेंद्र आव्हाडांना माफी मागण्यास सांगितले आहे.