उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण, काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:41 PM2024-01-20T18:41:38+5:302024-01-20T18:41:48+5:30
Ram Mandir: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण अद्याप पाठवण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, आज ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण देशभारातील अनेक मान्यवरांना पाठवण्यात आलं आहे. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना या सोहळ्याचं निमंत्रण अद्याप पाठवण्यात न आल्याने त्याची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू होती. तसेच २२ तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोळ्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिर येथे जाऊन पूजा आणि महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, आज ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. कुरिअरद्वारे उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून अयोध्येतील सोहळ्याला जाणार की, आपला कुणी प्रतिनिधी पाठवणार की, इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांप्रमाणे हे निमंत्रण नाकारणार, याबाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं विविध मान्यवरांसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र विरोधी पक्षाती बहुतांश नेत्यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्यात शिवसेनेचा मोलाचा वाटा होता, असा दावा उद्धव ठाकरे नेहमी करत असतात. त्यामुळे आता त्या जागी राम मंदिर उभं राहून त्यात प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे उपस्थितीबाबत काय भूमिका घेणार यााबाबत उत्सुकता आहे.