‘राम मंदिर’रेल्वे स्थानक आजपासून सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 04:09 AM2016-12-22T04:09:02+5:302016-12-22T04:09:02+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान नव्या राम मंदिर रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा २२ डिसेंबर रोजी होत आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान नव्या राम मंदिर रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा २२ डिसेंबर रोजी होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा सायंकाळी ४ वाजता होईल. मात्र, राम मंदिर रोड स्थानकाच्या नामकरण आणि उभारणीच्या श्रेयावरून शिवसेना व भाजपात सोशल मीडिया, होर्डिंग्ज, तसेच पत्रकबाजीवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
एमआरव्हीसीने एमयूटीपी-२ अंतर्गत हार्बर मार्गावरील अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान ओशिवरा नव्या स्थानकाची मागणी होत होती आणि हे स्थानकाही एमआरव्हीसीकडून बांधण्यात आले. मात्र, स्थानक पूर्ण होताच, त्याला राम मंदिर नाव देण्याची मागणी होऊ लागली आणि राज्य सरकारने हे नाव देण्यास मंजुरीही दिली. राम मंदिर स्थानक हार्बरवासीयांबरोबरच पश्चिम रेल्वे प्रवाशांनाही उपलब्ध होणार आहे. अजूनही गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार न झाल्याने, हे स्थानक प्रथम पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनाच उपलब्ध होईल. या मार्गावर धिम्या लोकल थांबतील.
दरम्यान, राम मंदिर स्थानक उभारण्यापासून ते नामकरण करण्यावरून शिवसेना व भाजपामध्ये श्रेष्ठत्त्वाची लढाई होत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी सोशल मीडिया, होर्डिंग्जद्वारे याचा प्रचारही केला जात आहे.
शिवसेनेने खासदार गजानन कीर्तीकर यांचे राम मंदिर रोड नामकरणाचे लोकसभेतील भाषणच सोशल मीडिया आणि यूट्युबवर टाकले आहे. शिवसेना आणि भाजपा यांनी तर सोशल मीडियावर आपापल्या नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत टाकून त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यासह, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी, महिला व बालकल्याण राज्यमंत्री आणि गोरेगावच्या स्थानिक आमदार विद्या ठाकूर, भाजपा आमदार अमित साटम आदी लोकप्रतिनिधी व रेल्वेचे अधिकारीही या वेळी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)