मुंबई काँग्रेसच्या कार्यक्रमात राम मंदिराची मागणी
By admin | Published: July 3, 2017 05:14 AM2017-07-03T05:14:10+5:302017-07-03T05:14:10+5:30
मुंबई काँग्रेसच्या संत, मंहत सेलच्या पहिल्याच कार्यक्रमात रविवारी ‘जय श्रीराम’चा नारा घुमला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीतच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या संत, मंहत सेलच्या पहिल्याच कार्यक्रमात रविवारी ‘जय श्रीराम’चा नारा घुमला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीतच अयोध्येत राम मंदिर उभारण्याची आग्रही मागणी ध्यानयोगी ओमदासजी महाराज यांनी केली. तर, स्वत: निरुपम यांनी मी कट्टर हिंदू आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच मुंबई संत-महंत काँग्रेसची स्थापना करण्यात आल्याचे सांगत काँग्रेसजनांनाच धक्का दिला.
संजय निरुपम यांच्या पुढाकाराने अलीकडेच मुंबई काँग्रेसच्या संत-महंत सेलची स्थापना करण्यात आली. ध्यानयोगी ओमदासजी महाराज यांच्याकडे या सेलचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. काँग्रेसच्या या संत-महंत सेलचा पहिला कार्यक्रम रविवारी सांताक्रूझ येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मुंबईमधील छोट्यामोठ्या मंदिरांच्या पुजाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र, मोठे साधू अथवा संत, महंत या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. यावेळी बोलताना ओमदासजी महाराज म्हणाले की, ज्या प्रमाणे मुस्लिमांसाठी मक्का आणि ख्रिश्चनांसाठी रोम पवित्र भूमी आहे तशी हिंदूंसाठी अयोध्या आहे. अयोध्या रामजन्मभूमी असून तिथे प्रभू रामाचे भव्य मंदिर व्हायला हवे. दिवंगत राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राम मंदिराचे दरवाजे उघडले होते. वर्षानुवर्षे कुलुपबंद असणारे प्रभू रामांचे दर्शन त्यांच्यामुळे झाले.
ओमदासजी महाराज यांच्याप्रमाणे निरुपम यांनी थेट राम मंदिराची मागणी केली नाही. मात्र, आपण स्वत: कट्टर हिंदू आहोत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या नावाखाली होणाऱ्या अपप्रचाराला आळा घालण्यासाठी संत-महंत सेलची स्थापना केल्याचे सांगितले. भाजपा सरकारच्या गोहत्या विरोधी कायद्याला आमचा विरोध नाही. पण, याचा अर्थ कोणीही कायदा हातात घ्यावा असा होत नाही. रस्त्यात गायीवरून लोकांना मारहाण होता कामा नये. गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याप्रमाणेच शिक्षा व्हायला हवी. सर्व धर्मांना समान सन्मान मिळायला हवा, ही काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे, असे निरुपम म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस हा हिंदू धर्मविरोधी, हिंदूविरोधी पक्ष आहे अशी इतर पक्षांनी चुकीची प्रतिमा बनवली आहे. काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. महात्मा गांधी धर्मनिरपेक्ष ्नहोते. पण तेही आपल्या सभेची सुरुवात रघुपती राघव राजाराम या भजनाने करत. यावेळी ओमदासजी महाराज यांच्यासह महंतश्री रामसेवक दासजी महाराज- ओंकारेश्वर, महंतश्री हरदेवदासजी महाराज, महंतश्री राजेंद्रप्रसाद पांडे, जयप्रकाश सिंह आदी उपस्थित होते.