‘आयटी’तील सुरक्षा रामभरोसे

By admin | Published: February 8, 2017 03:01 AM2017-02-08T03:01:02+5:302017-02-08T03:01:02+5:30

लाखोंना रोजगार प्राप्त करून देणारे राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान हिंजवडी क्षितिजापलीकडे विस्तारली आहे. देशाच्या अर्थकारणात आयटी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे

Ram security with IT security | ‘आयटी’तील सुरक्षा रामभरोसे

‘आयटी’तील सुरक्षा रामभरोसे

Next

वाकड/हिंजवडी : लाखोंना रोजगार प्राप्त करून देणारे राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान हिंजवडी क्षितिजापलीकडे विस्तारली आहे. देशाच्या अर्थकारणात आयटी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे हिंजवडी या छोट्याशा गावाने जगाच्या नकाशात स्थान मिळविले. परंतु, गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक झाला आहे. यामुळे हिंजवडी परिसर सध्या विकासाच्या बाबतीत आघाडीवर आहे, मात्र या तुलनेत अतिसंवेदनशील व कायम हिट लिस्टवर असलेल्या हिंजवडीतील आणि तळवडे आयटी
कामगारांच्या सुरक्षेवर ‘लोकमत’ने टाकलेला प्रकाश...

वाकड : आयटीत सुरक्षेच्या कुठल्याही ठोस उपाययोजना येथे करण्यात आलेल्या नाहीत. पोलिसांची कुठलीही चोख सुरक्षाव्यवस्था नसल्याने आयटीची सुरक्षा रामभरोेसे असल्याचे येथे जाण्यासाठी कुठलीही चौकशी, परवानगी अथवा तपासणीच्या अडथळ््याशिवाय निर्विघ्नपणे थेट आयटीच्या झगमगाटात घुसता येते, शिवाय कुठल्याही वाटेने पुन्हा बिनबोभाट निघून जाता येते. त्यामुळे आव-जाव घर तुम्हारा अशीच परिस्थिती येथे झाली आहे. येथे दररोज दाखल होणाऱ्या सुमारे पाच लाख कर्मचारी अन् असंख्य आयटी कंपन्यांनी सुरक्षेसाठी कोणावर विसंबून राहायचं, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयटीच्या विस्ताराने परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे ६८५ एकर क्षेत्रफळात ही विशाल आयटीनगरी वसली असून तीन टप्प्या मध्ये (तीन फेज) ती विस्तारली आहे. पहिला टप्पा ९७ , दुसरा टप्पा २३७, तर तिसरा टप्पा ३६५ एकरांत विभागला गेला असून, चौथ्या टप्प्यातील (फेज मधील) अनेक जागतिक दर्जाच्या आयटी कंपन्यांचे काम सुरू आहे. हिंजवडी, माण, मारुंजी, कासारसाई या गावांपर्यंत आयटी पार्क विस्तारले आहे. सध्या हिंजवडीत ४५ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी कंपन्या आहेत, तर ३६ इंजिनिअरिंग, १० फार्मास्यूटिकल व २० पेक्षा अधिक आॅटोमोबाईल कंपन्यांव्यतिरिक्त असंख्य लहान-मोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत. सर्व कंपन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

गंभीर गुन्ह्यांचा वाढता आलेख'
हिंजवडी : तळवडेतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण आयटी सेक्टर हादरले. यानंतर रसिका हत्या प्रकरणाने सुरक्षिततेचे वाभाडे ओढले. हिंजवडी आयटीत सुरक्षाव्यवस्था चोख असूनही काही प्रमाणात हिंजवडी हद्दीत गंभीर गुन्ह्याचा आलेख मागील काळात वाढतच असून, गेल्या काही वर्षातील अनेक खुनांचा उलगडा होऊ शकला नाही. यामुळे सतर्क असलेल्या पोलिसांसमोरही अशा प्रकरणामुळे आव्हान निर्माण होत आहे.
आयटी अभियंते आणि कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने तसेच काही गंभीर घटनांची दखल घेत हिंजवडी पोलीस आणि हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन यांनी संयुक्तपणे अनेक मोहिमा राबवित सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अनेक उपाययोजना केल्या आहेत. कंपनीत येण्या-जाण्यासाठी असलेल्या कॅबमध्ये महिला अभियंत्यांसाठी खास महिला सुरक्षारक्षक नेमण्यात आल्या आहेत.


समन्वयाअभावी घडताहेत दुर्घटना
वाकड : हिंजवडीतील तारांकित आयटी कंपन्यांचे संपूर्ण कामकाज परदेशात चालते. त्याअनुषंगाने येथे तीनही शिफ्टमध्ये तसेच रात्रपाळीत अधिक काम चालते. यामुळे येथे पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून महिला व आयटी तरुणी कामे करत असल्या तरी याचा धोकाही तेवढाच असल्याचे या काही घटनांवरून दिसते. त्यामुळे स्थानिक पोलीस, नागरिक आणि कंपन्या प्रशासन व आयटी तरुण-तरुणी या सर्वांचा उत्तम समन्वय साधल्यास अनेक विघातक कृत्यांना आळा बसेल, असे काही जाणकार सांगतात.
आयटी कंपन्यांनी भौतिक सुरक्षेबाबत ज्याप्रमाणे जागरूक आणि अ‍ॅलर्ट असतात त्याचप्रमाणे कंपनीच्या आतमध्येदेखील तेवढीच सुरक्षितता ठेवली पाहिजे. काही कंपन्या केवळ वरवरचा दिखाऊपणा करतात, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बाबी परिपूर्ण नसतात.
रसिलाची हत्या करणारा कंपनीतीलच एक रखवालदार होता. त्यामुळे ज्याच्यावर आयटीयन्स तरुण-तरुणींच्या सुरक्षेची जबाबदारी असते. हे सर्व तरुण रखवालदारावर विसंबून असतात. यातील बहुतेक आयटी कंपन्यांचे काम परदेशात चालते यांचे आॅनलाईन काम चालते, त्याअनुषंगाने येथे तीन शिफ्टमध्ये काम सुरू असते. या वेळेत महिलांनादेखील कामाला यावेच लागते. रखवालदारानेच खून केल्याने विश्वास कोणावर ठेवायचा, हा प्रश्न आहे.

सुरक्षा एजन्सी
नेमणुकीला हरताळ
तळवडे : आयटी पार्कमध्ये सुरक्षा एजन्सीकडून कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करताना पत्ता, मूळ गाव, संबंधित कर्मचाऱ्यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल आदी बाबींकडे केवळ फार्स म्हणून पाहिले जाते. तसेच अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना केवळ तोंडओळख असल्यासही नेमणूक केली जाते. तसेच अशा सुरक्षा एजन्सीचे आॅडिट करताना अधिकारी वर्गाकडून बऱ्याच वेळेस हेतूत: दुर्लक्ष केले जाते. त्यातच महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असणाऱ्या क्षेत्रात त्याच प्रमाणात महिला सुरक्षारक्षक असणेही गरजेचे असतानाही ते राखले जात नाही.

Web Title: Ram security with IT security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.