राम मंदिर आज नाही तर कधीच नाही - उद्धव ठाकरे
By Admin | Published: October 13, 2016 12:08 PM2016-10-13T12:08:09+5:302016-10-13T12:12:03+5:30
शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार असा सवाल उद्धवनी मोदींना विचारला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - ' शिवसेना व इतर पक्षांसह भारतीय जनता पक्षाने बहुमताचे शिखर गाठले आहे. त्यामुळे ३०० खासदारांच्या जोरावर राममंदिराची उभारणी नाही करणार तर कधी करणार?' असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राममंदिराची उभारणी करण्याचे फर्मान सोडले आहे. ' राममंदिर आज नाही तर कधीच नाही. नुसते नारे देऊ नका, विटा रचायला सुरुवात करा. कळस चढवायचे काम शिवसेना करीलच' असेही उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा असल्याची आठवण करून देतानाच राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे, आता त्यावर वेळ वाया न घालवता हे काम तडीस न्यावे, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे.
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे :
- पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल’ हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा आत्मविश्वास वाढला आहे. लखनौ येथे दसरा मेळावा घेऊन पंतप्रधानांनी जय श्रीरामाचा नारा दिला आहे. मोदी यांनी व्यासपीठावरून दोन वेळा ‘जय श्रीराम’चा नारा देऊन उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रचाराचा ‘शंख’ फुंकला आहे. उत्तर प्रदेशात किती हालचाली झाल्या ते लवकरच कळेल. उत्तर प्रदेशातील निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे.
- स्वत: मोदी हे वाराणसी येथून लोकसभेवर निवडून गेले आहेत व पंतप्रधान होताच त्यांनी काशीला येऊन गंगा आरती केली. त्यामुळे ‘भाजप’ची छाती फुगली व हिंदुत्ववाद्यांची मनगटे फुरफुरली नसती तर नवलच. आतापर्यंत पंतप्रधान होताच नेते मशिदींचे दर्शन घेत. सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारीत, पण मोदी हे पहिलेच पंतप्रधान असे की, त्यांनी शपथ घेताच गंगा आरतीचे प्रयोजन केले व त्याचा चांगलाच परिणाम झाला. मोदी यांना त्यावेळीच विचारले होते की, ‘आता राममंदिर केव्हा?’ तेव्हा ठोस उत्तर रामभक्तांना मिळाले नाही. कारण लोकसभा विजयाचा जोश होता. पण आता त्या विजयाचा जोश संपला आहे व विधानसभा निवडणुकांचा शंखनाद सुरू झाल्याने माहौल तयार झाला आहे. त्यामुळेटविधानसभेसाठी ‘जय श्रीराम’चा नारा झाल्याची टीका विरोधकांनी सुरू केली.
- पंतप्रधानांनी लखनौला येऊन ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने राममंदिराची स्थापना होऊन सोन्याचा कळस चढेल या भावनेतून भाजपला मते मिळतील व राममंदिर झाले नाही तरी उत्तर प्रदेशात सत्तामंदिरी कमलपुष्पांचे अर्पण होईल. या भावनेतून सर्व चालले आहे. राममंदिराचे राजकारण जेवढे व्हायचे तेवढे झालेच आहे. आता किती राजकारण करायचे ते एकदा ठरवून टाका.