राम मंदिर-बाबरी वादावर सह्यांची मोहीम
By admin | Published: April 5, 2017 02:31 AM2017-04-05T02:31:42+5:302017-04-05T02:31:42+5:30
राम मंदिर-बाबरी मशीद कृती समितीने सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई : आयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद उभारण्याच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर, आता राम मंदिर-बाबरी मशीद कृती समितीने सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. केंद्र सरकारने संबंधित जागेवर राम मंदिर आणि बाबरी मशीद या दोन्ही वास्तू उभाराव्यात किंवा राम-रहीम रुग्णालय उभारावे, असा तोडगा या मोहिमेतून सुचविल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यात वादी आणि प्रतिवाद्यांना अपयश आले आहे. त्यामुळे लोकांना काय हवे आहे, हे सह्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळवणार आहे. राम नवमीच्या दिवशी सुरू झालेल्या मोहिमेला फक्त एकाच दिवसात पुण्यातून १० हजार लोकांनी सही करून पाठिंबा दर्शवला आहे. संपूर्ण देशात ही मोहीम राबवणार असून, अधिकाधिक नागरिकांच्या सह्या झाल्यानंतर, हे निवेदन केंद्र सरकारला सादर केले जाईल. १९९२ सालची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून ही मोहीम राबवत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
मंदिर आणि मशीद उभारल्यास हा वाद मिटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)