राम जन्मला १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८ साली
By Admin | Published: April 3, 2017 02:33 AM2017-04-03T02:33:03+5:302017-04-03T02:33:03+5:30
दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो
मुंबई : दरवर्षी चैत्र शुक्ल नवमी तिथी मध्यान्हकाली असेल, त्या दिवशी आपण ‘श्रीरामजन्म उत्सव’ साजरा करीत असतो, परंतु इंग्रजी - ग्रेगरियन तारखेप्रमाणे श्रीरामाचा जन्म कधी झाला, हे आपणास माहीत नसते. मात्र, आता हा इतिहास गवसला आहे. कल्याण येथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात उल्लेख केलेल्या खगोलीय घटनांचा अभ्यास आणि संशोधन करून, रामायणातील घटनांचा काल शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मेंडकी यांनी संशोधनाद्वारे श्रीराम जन्माची तारीख १ जानेवारी इसवी सन पूर्व ५६४८, चैत्र शुक्ल नवमी असल्याचे दाखविले आहे, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
प्रफुल्ल मेंडकी यांच्या संशोधनाविषयी माहिती देताना सोमण म्हणाले की, आतापर्यंत अनेक विद्वानांनी रामायणाचा काल निश्चित करण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये मतभिन्नताच आढळते, त्या वेळी संगणक उपलब्ध नव्हता. प्रफुल्ल मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावास्यांचा उल्लेख, चंद्र-सूर्य ग्रहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन, संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून रामायणकालाचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधन करीत असताना, त्यांनी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांचीही मदत घेतली आहे. (प्रतिनिधी)
>महाभारतावरही संशोधन
पुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाला
प्रा. मोहन आपटे यांची प्रस्तावना लाभली आहे. मेंडकी यांनी महाभारत कालावरदेखील संशोधन केले असून, तेही पुस्तक रूपाने लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.
>भविष्यातील पिढीसाठी उपयुक्त संशोधन
मेंडकी यांचे हे संशोधन पुढील काळात अधिक संशोधन करणाऱ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही सोमण यांनी व्यक्त केला. सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणातील या घटनांचा काल ठरविणे हे खूप कठीण काम आहे.
कदाचित काही ठिकाणी खगोलीय घटनांचा उल्लेख सापडलाही नसेल, सध्या गृहित धरल्या गेलेल्या गोष्टींशी संशोधित निष्कर्ष जुळत नसतील, परंतु प्रफुल्ल मेंडकी यांनी प्रामाणिकपणे रामायणात उल्लेखल्या गेलेल्या खगोलीय घटनांचा आधार घेऊन, संशोधनाचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे, असेही सोमण यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे, रामायणाच्या कालात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. कारण चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाची गतीही मंदावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार प्रफुल्ल मेंडकी यांनी हे संशोधन करताना केलेला आहे. कालमानाचे हे गणित करीत असताना, ‘डेल्टा टी’ नावाची कालशुद्धी करावी लागते. त्यामुळे गणितात अचूकता येत असते, तीही त्यांनी रामायणकाल ठरविताना केली आहे.