राम जन्मला गं सखे.. राम जन्मला!
By Admin | Published: April 5, 2017 01:21 AM2017-04-05T01:21:06+5:302017-04-05T01:21:06+5:30
श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला.
भोर : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रासादाच्या दरबार सभागृहात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपरिक पद्धतीने दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
या रामजन्मोत्सवाला भोरचे राजे चिमणाजी ऊर्फ आबाराजे पंतसचिव, त्यांच्या पत्नी ऊर्मिलादेवी, पुत्र राजेश, योगेश व नातू पार्थ, स्वातीदेवी, गायत्रीदेवी, ईशादेवी, निमिसादेवी, उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, के. टी. शेटे, नगराध्यक्षा तृप्ती किरवे, नगरसेवक तानाजी तारू, उमेश देशमुख, जगदीश किरवे, प्रसन्नकुमार देशमुख, प्रमोद कुलकर्णी, प्रमोद फडणीस, मधुकर पैठणकर, राजाभाऊ दुसंगे जकीर, गणीभाई भालदार, संतोष ढवळे, संजय देवकर, श्रीपाद गांडेकर, मुकुंद गांडेकर, महाशब्दे व शहरासह ग्रामीण भागातील भविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मंगळवारी सकाळी ११ वाजता राजप्रासादातून राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती, नागरिक ढोलताशा पथकाच्या गायन वाद्याच्या साथीने सजवलेल्या पालखीतून छत्र, चामरे, अब्दागिरी घेतलेले मानकरी यांच्यासह राजसुवर्णकार यांच्याकडे राममूर्ती आणण्यासाठी गेले. मूर्ती उत्साही मिरवणुकीने पालखीतून राजप्रसादात आणताना नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. नंतर ही मूर्ती सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली. मधुकर पैठणकर व राजाभाऊ दुसंगे यांनी रामाचे भजन गायले, प्रीती शानबाग हिने पाळणा गायला आणि दुपारी ठीक १२ वाजता आबाराजेंचे पुत्र राजेश, योगेश यांनी पाळण्याची दोरी ओढून रामाच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करीत श्रीरामाचा जयजयकार करीत घोषणा दिल्या. या वेळी हजारो भाविक, भक्तांना सुंठवडा व महाप्रसाद वाटप करण्यात आला.
पहाटेपासूनच भोर शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.
रांगोळी काढली होती. राजवाडा परिसरात विविध प्रकारची प्लास्टिकची खेळणी, मातीची भांडी, खाद्यपदार्थांचे, थंड पेयाचे कलिंगडाचे व विविध फळांच्या उसाच्या रसाचे स्टॉल लावण्यात आले होते. लहान मुलांना व वृद्धांना खेळण्यासाठी रेल्वेगाडी, झोपाळा, मिकी माऊस, जंपिंग जॅक याची सोय होती. त्यामुळे दिवसभर चिमुकल्यांसह आबालवृद्धांनी एकच गर्दी केली होती.
भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची सुविधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बजरंग आळी येथे, तर होमगार्ड पथकाने मंगळवार पेठेत तसेच गुरुकृपा ट्रस्टच्या वतीने राजवाड्यात करण्यात आली होती. सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी दर्शनासाठी राजवाड्यात रांगा लावल्या होत्या. भोर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भोरचे ग्रामदैवत जानाईदेवी यात्रा व श्रीरामनवमीनिमित्त राजबागेत कुस्त्याचा जंगी आखाडा व सुमारे एक लाख ३१ हजार रुपयेजानाई केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नामांकित महाराष्ट्र केसरी पैलवानांनी हजेरी लावली. भोरपासून १७ किलोमीटरवर असलेल्या सरदार कान्होजी जेधेच्या वाड्यात जेधेंचे वंशज रणधीर जेधे, युवराज जेधे व कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने श्रीरामनवमी साजरी करण्यात केली.
>१७२० पासून साजरा होतोय उत्सव
श्रीराम हे भोरचे संस्थानिक पंतसचिवांचे कुलदैवत असल्याने १७२० पासून हा जन्मोत्सव आणि सचिवपदाचे संस्थापक शंकराजी नारायण यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव. असे दोन्ही उत्सव वैभवाने व भव्यतेने साजरे करण्याची परंपरा सुमारे ३०० पेक्षा अधिक वर्षांपासून सुरु आहे.