सहभागी अंदाजपत्रकासाठी पालिकेला ‘रामचंद्रन पुरस्कार’
By Admin | Published: March 3, 2017 12:46 AM2017-03-03T00:46:48+5:302017-03-03T00:46:48+5:30
पालिकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या नागरिकांच्या सहभागी अंदाजपत्रकासाठी मानाचा ‘ई. रामचंद्रन पुरस्कारा’ने महापालिकेला गौरविण्यात आले
पुणे : पालिकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या नागरिकांच्या सहभागी अंदाजपत्रकासाठी मानाचा ‘ई. रामचंद्रन पुरस्कारा’ने महापालिकेला गौरविण्यात आले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जनाग्रह सेंटर फॉर सिटीजनशिप या संस्थेच्या वतीने नागरी विकेंद्रीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना हा पुरस्कार दिला जातो. पुणे महापालिकेला मिळालेला या पुरस्कारामध्ये पुणेकर नागरिक, मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याची भावना कुणाल कुमार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.
नागरिकांनी सुचविलेल्या विकासकामांसाठी अंदाजपत्रकामध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात येते. जनवाणी व इतर स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारामुळे ही संकल्पना चांगलीच यशस्वी ठरली आहे. (प्रतिनिधी)