आज सूर्यास्तानंतर रमजानला प्रारंभ; उद्यापासून रोजे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:59 AM2019-05-06T05:59:32+5:302019-05-06T05:59:48+5:30
रविवारी चंद्रदर्शन झाले नसल्याने रमजानला सोमवारी सूर्यास्तानंतर प्रारंभ होईल. मंगळवारी रमजानचा पहिला रोजा होईल. रविवारी रमजान महिन्याला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते.
मुंबई : रविवारी चंद्रदर्शन झाले नसल्याने रमजानला सोमवारी सूर्यास्तानंतर प्रारंभ होईल. मंगळवारी रमजानचा पहिला रोजा होईल. रविवारी रमजान महिन्याला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. मात्र, चंद्रदर्शन झाले नाही त्यामुळे सोमवारपासून रोजे होणार नाहीत, हे निश्चित झाले. सोमवारी चंद्रदर्शन होईल व मंगळवारपासून रोजे सुरु होतील, अशी माहिती सुन्नी रुयाते हिलाल कमिटी व आॅल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमा यांनी दिली.
रविवारी शाबान महिन्याची २९ तारीख होती व चंद्रदर्शन झाले असते तर रमजानला प्रारंभ झाला असता. मात्र, चंद्रदर्शन झाले नसल्याने सोमवारी शाबान महिन्याची ३० तारीख होईल व सूर्यास्तानंतर रमजन महिन्याला प्रारंभ होईल. इस्लामी पध्दतीत सुर्यास्तानंतर नवीन दिवसाची सुरुवात होते. रमजान महिन्यात रात्रीच्या नमाजनंतर विशेष तराबीह नमाज अदा केली जाते त्याला सोमवारी रात्रीपासून प्रारंभ होईल. एक महिना रोजे ठेवल्यानंतर रमजान ईद साजरी केली जाते.