माळशेजमध्ये दरडकोंडी

By Admin | Published: July 5, 2016 01:56 AM2016-07-05T01:56:43+5:302016-07-05T01:56:43+5:30

कल्याण-अहमदनगर मार्गावर माळशेज घाटात शंकर मंदिराजवळ रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास भल्या मोठ्या दरडी कोसळल्या. त्यामुळे या मार्गावर मढ ते टोकावडेदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद होती.

Rambling in the Malsege | माळशेजमध्ये दरडकोंडी

माळशेजमध्ये दरडकोंडी

googlenewsNext

ठाणे : कल्याण-अहमदनगर मार्गावर माळशेज घाटात शंकर मंदिराजवळ रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास भल्या मोठ्या दरडी कोसळल्या. त्यामुळे या मार्गावर मढ ते टोकावडेदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद होती. पोकलेनच्या साहाय्याने दरडी फोडून त्या हटवण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी ७च्या सुमारास वाहतूक टप्प्याटप्प्यांत सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळपर्यंत मार्ग पूर्णपणे खुला होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवली आहे.
रोज किमान पाच ते सात हजार वाहनांची वर्दळ असलेल्या मुंबई-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१वरील माळशेज घाटात दरडी कोसळल्यामुळे रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी अन्यत्र वळवली होती. घाटमाथ्यावरील अत्यंत धोकादायक वळणावरच शंकर मंदिराजवळ या दरडी कोसळल्या. त्या वेळी कोणतेही वाहन तिथून जात नव्हते. अन्यथा, मोठी हानी झाली असती, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रीती नाग यांच्या पथकाने सोमवारी सकाळी ७.३०पासून या ठिकाणी दरडी हटवण्याच्या कामाला सुरुवात केली. दरडी मोठ्या असून, मुसळधार पावसामुळे पुन्हा दरडी कोसळण्याची भीती होती. शिवाय रस्त्यावर दाट धुके होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत होते. यासाठी एक पोकलेन, एक जेसीबी आणि एका स्टोनब्रेकरचीही मदत घेण्यात आल्याची माहिती येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
कल्याण ते ओतूर आणि नगर ते कल्याण तसेच ओतूर ते कल्याण व ठाण्याकडे याच मार्गावरून भाजीपाला, दूध तसेच इतर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. (प्रतिनिधी)

वाहनांच्या रांगा
रविवारी रात्री दरडी कोसळल्यामुळे मार्ग सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद केला होता. त्यामुळे आळेफाटामार्गे कल्याण, ठाण्याकडे येणाऱ्या अनेक एसटी बसेस आणि इतर वाहने ओतूरपासून मागे नाशिकमार्गे वळवली होती. तर, मुरबाड ते अहमदनगर जाणारी वाहतूक शहापूरमार्गे नाशिककडे वळवण्यात आली होती. तसेच नगरला जाणारी वाहतूक घोटीमार्गे, तर पुण्याकडे जाणारी वाहने कर्जतमार्गे वळवल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली.

Web Title: Rambling in the Malsege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.