रामदास आठवले, मेटेंना संधी कमीच
By Admin | Published: June 28, 2016 04:45 AM2016-06-28T04:45:33+5:302016-06-28T04:45:33+5:30
मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात खा.रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा समावेश होण्याची शक्यता दिसत नाही
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात खा.रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा समावेश होण्याची शक्यता दिसत नाही. मंत्रिमंडळ विस्तारात रासपचे आ.महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आ.सदाभाऊ खोत यांनाही स्थान मिळणार नव्हते, मात्र भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या चारही मित्रपक्षांना सामावून घेण्याबाबत भाजपामध्ये सुरुवातीला दिल्ली व मुंबईतील नेत्यांमध्ये मतभिन्नता होती. तथापि, आता जानकर आणि खोत यांना संधी देण्यावर जवळपास एकमत झाल्याचे समजते. शिवसंग्रामचे मेटे यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जादेखील आहे. छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवून मराठा समाजात आपला पाया अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. अशावेळी मेटेंना मंत्रीपद देऊन मित्रपक्षातील मराठा नेतृत्वाला मोठे करण्यास भाजपा उत्सुक नाही. आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. मात्र, त्यांच्या पक्षाला राज्यात मंत्रीपद मिळणार नाही. त्या ऐवजी त्यांच्या पक्षाला दोन महत्त्वाच्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.
आ.जानकर यांना पर्याय म्हणून नागपूरचे डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. मात्र, जानकर यांचे नेतृत्व झाकाळून महात्मे हे धनगर समाजात त्यांची जागा घेण्याची शक्यता नाही. शिवाय, आजच्या परिस्थितीत जानकर यांना डावलणे भाजपाला परवडणारे नाही. समाजात आजही त्यांचे स्थान आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले पाहिजे, असा भाजपामध्येही सूर असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने लोकमतला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
>जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपदे दिली जातील. मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना अद्याप ही नावे देण्यात आलेली नाहीत. गुलाबराव पाटील, अर्जून खोतकर, विजय औटी आणि डॉ.नीलम गोऱ्हे हे चार प्रमुख दावेदार आहेत. गोऱ्हे वगळता इतर तिघे विधानसभेचे सदस्य आहेत.