रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते, रिपब्लिकन ऐक्य हा कालबाह्य विषय - आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 05:27 PM2018-01-15T17:27:16+5:302018-01-15T17:40:32+5:30
कोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे.
पुणे - कोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे. सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली.
आंबेडकर यांनी सोमवारी वढू येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीसह कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. यासोबतच त्यांनी पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त अधिक्षक संदीप पखाले यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. याकसंदर्भात त्यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
कोरेगाव भीमाच्या दंगलीमागे असलेल्या भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करून खरे आरोपी गजाआड करावेत अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात नक्षलवादी संबंध जोडून शासन मुळ आरोपींवरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारची या प्रकरणातील भुमिका सुरूवातीपासूनच संशयास्पद असून भिडे आणि एकबोटेंना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आंबेडकरी जनता आपली ताकत दाखवून देईल. रिपब्लिकन सेना या निवडणुका लढणार असू सर्व राजकिय पर्याय खुले ठेवल्याचेही ते म्हणाले.