रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना-भाजपाला मान्य होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:40 PM2021-11-17T21:40:38+5:302021-11-17T21:41:52+5:30
मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं.
मुंबई – राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. २५ वर्ष युतीत असलेले शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत(Congress-NCP) घरोबा केला. महाराष्ट्रात याआधी कधीही अस्तित्वात न आलेलं राजकीय समीकरण जुळलं आणि महाविकास आघाडीची स्थापना करत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आले.
मुख्यमंत्रिपदामुळे भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राज्यात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेना-भाजपा यांनी एकत्र यावं आणि शिवसेनेचा ५ वर्ष मुख्यमंत्री राहावा असं पुन्हा एकदा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयनं म्हटलं आहे. शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपासोबत पुन्हा महायुतीचे सरकार आणणे हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी मांडली आहे.
याबाबत रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह(Amit Shah), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजपा शिवसेना आरपीआय शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजपा शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील सहभाग द्यावा. या पर्यायावर भाजपा आणि शिवसेना यांनी विचार करावा असं आवाहन आठवलेंनी केले आहे. त्यामुळे आता महायुतीचा हा नवा फॉर्म्युला रामदास आठवलेंनी मांडला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा विचार करणार का? हे आगामी काळात आपल्याला दिसून येईल.