रामदास आठवले यांच्या गाडीला पुण्यात अपघात
By admin | Published: June 28, 2017 08:22 AM2017-06-28T08:22:13+5:302017-06-28T10:30:47+5:30
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुणे येथे हायवेवर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुणे येथे हायवेवर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पुण्यात किवळेफाटा हायवे येथे रस्त्याच्या मधोमध एक तवेरा गाडी उभीर होती. सुरुवातीला रस्त्यात गाडी उभे असल्याचे आठवले यांच्या गाडीच्या चालकाला दिसले नाही. मात्र ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं स्वतःची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यावेळी आठवले यांच्या वाहनामागे असलेल्या पोलीस वाहनाची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. यात रामदास आठवले यांच्या वाहनाचे नुकसान झाले मात्र सुदैवानं कुणीही जखमी झालेले नाही. रामदास आठवलेदेखील सुखरूप आहेत.
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, महाराष्ट्र सचिव श्रीकांत भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि रिपाइंचे प्रसिद्ध प्रमुख हेमंत रणपिसे व सहाय्यक खासगी सचिव प्रवीण मोरे हेदेखील होते. हे सर्वजण सुखरूप आहेत.
पुण्यातली बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले तेथे निधाले होते. या अपघातानंतर त्यांनी कार्यक्रमास हजेरीदेखील लावली व त्यानंतर पुढे अहमदनगरकडे रवाना झाले.
दरम्यान, कार्यक्रमात रामदास आठवले यांनी राजकीय टिपण्णी करताच बालगंधर्व रंगमंदिरात एकच हशा पिकला. ‘मी बरेच दिवस शरद पवारांबरोबर राहिलो, त्यांच्याकडून राजकारण शिकलो. सध्या ते आमचे मित्र नाहीत. राजकारणात फार काळ एका व्यक्तीसोबत रहायचे नसते. आता मी पुढील १० वर्षे तरी नरेंद्र मोदींना सोडणार नाही, तेही मला सोडणार नाहीत. त्यानंतर हवा ज्या दिशेला वाहणार, तिकडे आम्ही जाणार! हवेची दिशा जाणून प्रवास केल्यासच राजकारणात टिकाव लागतो’, अशा मिश्किल शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय टिपण्णी करताच बालगंधर्व रंगमंदिरात हास्याचे फवारे उडाले.
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित हास्य कवी संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, हास्यकवी बंडा जोशी, भरत दौंडकर, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.
‘आपल्या देशात केल्यामुळे नोटबंदी, फारच परेशान दिसताहेत राहूल गांधी, देशात आलीये नरेंद्र मोदींची आंधी, त्यांनी तोडून टाकली काँग्रेसची फांदी’, ‘शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली, काँग्रेसची सत्ता गेली’ अशा कविता सादर करत आठवलेंनी वातावरणात हास्याचे रंग भरले.
आठवले म्हणाले, ‘माझ्या पक्षाची ताकद लहान असली तरी आम्ही २९ राज्यात कार्यरत आहोत. गावागावात माझी कणसासारखी गोड माणसे काम करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे विचार घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.’