रामदास अठावलेंचं गृहमंत्री अमित शाहंना पत्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवाट लावण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 04:20 PM2021-03-22T16:20:57+5:302021-03-22T16:22:51+5:30
परमबीर सिंग यांचे पत्र आज थेट संसदेत पोहोचले. याच मुद्द्यावर आज शरद पवार यांनीही पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याचे राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. यातच आता भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास अठावले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा विचार करत येथे राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याने, ही मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून आणि त्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बवरून विरोधी पक्ष सरकारवर दबाव टाकत आहे. मात्र, सरकारने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, "परमबीर सिंग यांचे पत्र तथ्यहीन आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती. हे सिद्ध झाले आहे". मात्र, पवारांचा हा दावा खोडून काढत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक व्हिडीओ शेअर करत १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे म्हटले आहे.
त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख बोलले -
त्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले, कोरोनाचे निदान झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो. तत्पूर्वी, परमबीर सिंग यांचे पत्र आज थेट संसदेतही पोहोचले.