Ramdas Athawale: “राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत, ‘ती’ भूमिका अयोग्य”: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:02 PM2022-04-11T17:02:12+5:302022-04-11T17:03:53+5:30
Ramdas Athawale: बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत. परंतु, ते आमच्यासोबत येत नाही, याचा खेद वाटतो, असे रामदास आठवले म्हणाले.
पुणे: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद आठवडाभरानंतरही राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळातून अद्यापही प्रतिक्रिया येत आहेत. यातच केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर भाष्य केले असून, राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत, असे म्हटले आहे.
मशिदींवरचे अजानचे भोंगे हटवले नाहीत, तर त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावली जाईल, अशा आशयाचे विधान राज ठाकरे यांनी केले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मांडलेल्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नाही. विरोधाला विरोध योग्य नाही, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत
कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावतो, अशी भूमिका घेणे योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा, असे राज ठाकरे म्हणाले होते.