Ramdas Athawale: “२०२४ मध्ये भाजपला तब्बल ४०० जागा मिळतील”; रामदास आठवलेंचे मोठे भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:18 PM2022-04-12T23:18:20+5:302022-04-12T23:19:43+5:30
Ramdas Athawale: देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा पंतप्रधान मोदींकडे असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
सातारा: देशातील राजकीय पक्षांचे लक्ष हळूहळू सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे (Lok Sabha Election 2024) वळू लागले आहे. अनेक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ४०० जागा मिळतील, असा दावा आठवले यांनी केला आहे.
साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उद्घाटनानिमित्त ते आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधला. देशाचे नेतृत्व करण्यासाठी धोरणाचा खमकेपणा मोदी यांच्याकडे आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ झाली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप तब्बल ४०० जागा मिळवेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
कोणत्याही पोटनिवडणुकीत भाजप मोठा पक्ष
कोल्हापूर विधानसभा निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू. २०२४ च्या निवडणुका आणि कोणत्याही पोटनिवडणुका यामध्ये भाजपा हा मोठा पक्ष असल्याने आणि संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने ४०० हून अधिक जागा मिळू शकतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती आणि एकूणच राज्य कारभाराविषयी सर्वसामान्यच काय तर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आकर्षण आहे. त्यांचे नेतृत्व आणि कामाची पद्धत यामुळे केंद्र स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या विकास योजना राबविल्या जात आहेत. देशाची आर्थिक स्थिती आणि जीडीपी याच्या मध्ये वाढ होत आहे. त्यांच्या कामाची पद्धतीने भाजप सर्वसामान्य जनतेच्या जवळ जात आहे. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी मध्ये समाविष्ट असणाऱ्या शिवसेना पक्षावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, मनसेला सोबत घेणे योग्य वाटत नाही. मनसेचे सध्या वादळ असले तरी त्यांना फारशी मते मिळतात असे नाही. आता हिंदुत्ववादाचा मुद्दा घेतला असला तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचा वादळ हे भाषणांचा आहे, मतांचं नाही असा टोला आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला.