“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:46 IST2025-04-08T17:43:37+5:302025-04-08T17:46:15+5:30

Ramdas Athawale News: अनावश्यक मुद्द्यांवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

ramdas athawale said it is fine that marathi should come to mumbai but we do not agree with raj thackeray stance | “मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले

“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा. तसेच मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय नेते रामदास आठवले यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही, असा पुनरुच्चार रामदास आठवले यांनी केला.

पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांना मनसेने मराठी भाषेसाठी घेतलेल्या आग्रही भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर रामदास आठवले यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना संधी दिलेली आहे. मुंबई ही मराठी भाषिकांचीही आहेच. मराठी बोलले पाहिजे हे ठीक आहे. दक्षिण भारतातील किंवा उत्तर भारतातील युवावर्ग चांगल्या पद्धतीने मराठीत बोलतात. बँकेत जाऊन तुम्ही म्हणाल की, हे सगळे करा, तर ही भूमिका अयोग्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी इकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

अनावश्यक मुद्द्यांवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही

अनावश्यक मुद्द्यांवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला होता. परंतु, तेवढा फायदा आम्हाला झाला नाही. विधानसभेत ते आमच्यासोबत नसतानाही आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून आणल्या, असा खोचक टोला आठवले यांनी लगावला. तसेच  सर्वांना सावरण्याचे काम मुंबईने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जावू नये. ते दोन-तीनदा जाऊन आले आहेत. मुंबई बदनाम करून इकॉनॉमी कमी करण्याचे काम आहे. ही भूमिका अयोग्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि मनसेने विकासाबद्दल बोलले पाहिजे. दादागिरी करणे योग्य नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल. त्या याचिकेमागील षड्‍यंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे षड्‍यंत्र  आहे. हे भाजपाचे षड्‍यंत्र आहे. हे लोक भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचे की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

 

Web Title: ramdas athawale said it is fine that marathi should come to mumbai but we do not agree with raj thackeray stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.