'रामदास' बोट दुर्घटनेला ६९ वर्ष पूर्ण, ६२५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू

By Admin | Published: July 17, 2016 11:30 AM2016-07-17T11:30:24+5:302016-07-17T11:30:24+5:30

सागरी इतिहासात टायटॅनिक बोट दुर्घटनेला जितके महत्व आहे. तितकेच महत्व भारताच्या सागरी इतिहासात 'रामदास' बोट दुर्घटनेचे आहे.

The Ramdas boat crash had completed 69 years, 625 passengers had died | 'रामदास' बोट दुर्घटनेला ६९ वर्ष पूर्ण, ६२५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू

'रामदास' बोट दुर्घटनेला ६९ वर्ष पूर्ण, ६२५ प्रवाशांचा झाला होता मृत्यू

googlenewsNext

संजीव वेलणकर 

सागरी इतिहासात टायटॅनिक बोट दुर्घटनेला जितके महत्व आहे. तितकेच महत्व भारताच्या सागरी इतिहासात 'रामदास' बोट दुर्घटनेचे आहे.  मुंबई बंदरापासून अवघ्या 9 मैलांवर रामदास बोटीला जलसमाधी मिळाली होती. आज या घटनेला ६९ वर्ष पूर्ण झाली. 17 जुलै 1947मध्ये मुंबईहून रेवसला निघालेली रामदास बोट बुडून सुमारे 625 लोक मरण पावले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ही भीषण सागरी दुर्घटना घडली होती.

17 जुलै 1947चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली‘रामदास’बोट मुंबई बंदरापासून अवघ्या 9 मैलांवर असलेल्या‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली.तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे 625 जण समुद्रात बुडून मरण पावले.
 
या भीषण दुर्घटनेतून 232 उतारूंचा सुदैवाने जीव बचावला.त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता.रामदास बोट बुडाली ती सकाळच्या वेळेत.या बोटीतील प्रवाशांपैकी ज्यांना उत्तम पोहता येत होते,ते त्या दिवशी दुपारी तीन वाजता ससून डॉकच्या किना-याला लागले.त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिका-यांना मिळाली.नाहीतर तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणाला गंधवार्ताही नव्हती.
 
रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ,लालबाग या गिरणगाव परिसरातील तसेच गिरगाव भागातील होते.हे सारे मूळ कोकणवासी असल्याने रामदास अपघातातील हानीमुळे मुंबई,ठाणे,कुलाबा,रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमांत आमुलाग्र सुधारणा झाल्या. अत्याधुनिक दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसू लागली.
 
रामदास बोटीचा अपघात हा अचानक आलेल्या वादळामुळेच घडला आहे,असे काही बचावलेल्या उतारूंच्या मुलाखतीवरून दिसून आले .रेवसला जाणारी रामदास बोट दररोज दुपारी सव्वा वाजता मुंबईस परत येते.बोटीची वेळ होऊन दोन-तीन तास झाले तरी ती का आली नाही याची कंपनीने चौकशी करणे जरूर होते.पण अपघातस्थळाची अवस्था पाहून रेवसचे कोळी परतल्यानंतरच‘रामदास’च्या अपघाताची माहिती सर्व संबंधितांना कळली!त्यानंतर मग मदतयंत्रणेची धावाधाव सुरू झाली.यावरून अद्ययावत साधनांनी युक्त अशा मुंबई शहरापासून अवघ्या 10-12 मैल असलेल्या रेवससारख्या बंदरी तारायंत्रांचे अगर टेलिफोनचे साधन नसावे हे आश्चर्य आहे.’
 
‘दर्यावर्दी’च्या ऑगस्ट 1947च्या अंकामध्ये‘खवळलेल्या समुद्रात उडी टाकून 75 उतारूंना जीवदान देणारे रेवसचे धाडसी दर्याबहाद्दर’या शीर्षकाचा लेख आहे.रामदास अपघातासंबंधी वेगळी माहिती देणा-या या लेखामध्ये म्हटले आहे‘17 जुलै 1947च्या सकाळी रेवस येथून मुंबईला रोजच्या प्रमाणे ताजी मासळी घेऊन कोळ्यांची गलबते येत होती.नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही कोळी पाच गलबते हाकारून निघाले.त्यांच्या गलबतांवर सुमारे दोन हजार रुपयांची मासळी होती.
रेवसपासून अंदाजे तीन सागरी मैलांवर आल्यावर त्यांना समुद्राकडील वातावरणात फरक दिसला.दर्या तुफान झाला होता.
 
आकाशात एकाएकी काळेकुट्ट ढग येऊन अंधार पसरू लागला होता.वादळाच्या काळ्या रेषा क्षितिजावर दिसू लागल्या होत्या.या
चिन्हांवरून पुढे जाऊ नये,असे या कोळी बांधवांना वाटले व त्यांनी आपली गलबते सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा रेवस बंदरात आणली.पण लगेच एका तासाने चमत्कार झाला.वादळी चिन्ह नाहीशी होऊन सृष्टीने सौम्य स्वरूप धारण केले.तेव्हा आता मुंबईला जाण्यास हरकत नाही,असा विचार करून कोळी मंडळीने आपली गलबते मुंबईच्या मार्गाने पुन्हा हाकारली.
 
पाच गलबतांचा तांडा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाला.रेवसपासून चार-साडेचार मैलांवर त्यांची गलबते आली असतील नसतील तोच त्यांच्या दृष्टीला चमत्कारिक दृश्य दिसले.समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य माणसे पोहत असून त्यांच्यातच प्रेते वाहात चालली आहेत,असे भीषण दृश्य कोळ्यांनी पाहिले.त्यांना या प्रकाराचा काहीच उलगडा झाला नाही.एवढी माणसे एकाएकी कुठून आली याचा ते विचार करू लागले.पण ती वेळ विचार करायची नव्हती.कोळी बंधूंनी आपली गलबते झपाझप त्या बाजूला नेली.जी माणसे समुद्रात पोहत जीव वाचवण्यासाठी धडपडत होती,त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतांवर घेण्यास सुरुवात केली.त्या वेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतातील 2 हजार रुपयांची मासळी समुद्रात फेकून दिली.
 
माणसाच्या जीवितांपुढे त्यांनी आपल्या मालाची पर्वा केली नाही.जिवंत माणसांना वाचविण्यासाठी काही कोळ्यांनी समुद्रात उड्या टाकून भराभर माणसांना गलबतांवर चढविण्यास सुरुवात केली.हे बुडणारे प्रवासी रामदास बोटीवरीलच होते.कोळी मंडळींनी दृष्टीच्या टापूत दिसतील तेवढ्या माणसांना म्हणजे 75 जणांना वाचविले व त्यांना घेऊन ही पाचही गलबते रेवसला त्यादिवशी दुपारी एक वाजता पोहोचली.या वाचविलेल्या प्रवाशांना रेवसच्या कस्टम अधिका-यांच्या हवाली करण्यात आले.रेवस येथील कस्टमच्या अधिका-यांनी ही बातमी तारेने संबंधितांना कळविण्यासाठी त्वरेने अलिबागला धाव घेतली.’
 
‘दर्यावर्दी’च्या ऑ गस्ट 1947च्या अंकामध्ये रामदास बोटीच्या दुर्घटनेतून वाचलेल्या विश्वनाथ कदम या त्यावेळी 16 वर्षे वय असलेल्या मुलाची विस्तृत मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यात त्याने रामदास बोटीचा अपघात नेमका कसा घडला व तो त्यातून वाचून स्वत:च पोहत किना-याला कसा लागला याची अंगावर काटा आणणारी कथा आहे.

Web Title: The Ramdas boat crash had completed 69 years, 625 passengers had died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.