जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:46 AM2023-01-11T11:46:20+5:302023-01-11T11:47:34+5:30
बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं.
रत्नागिरी - बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे आणि त्याच्यानंतर लहान भाऊ तेजस ठाकरे. जी काही अक्कल आहे ती ठाकरेंनाच आहे. आम्ही सगळे बेअक्कल आहोत. बाळासाहेब आमच्यासाठी देव होते. त्यांनी शून्यातून आम्हाला उभे केले. आम्हाला बाळासाहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी उभी केली. हिंदुत्व जपलं. ते हिंदुत्व आणि बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर गहाण ठेवली. खरी गद्दारी त्यांनी केली असा हल्लाबोल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, नागपूरच्या अधिवेशनात जयंत पाटील स्पष्टच बोलले. ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे. मनात जे होते ते ओठांवर आले. बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले. गद्दारी ही उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. आम्ही भाजपात जाणार असं म्हटलं जातं. परंतु आजच सांगतो मरेपर्यंत आम्ही भगवा झेंडा सोडणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
धनुष्यबाण आम्हालाच मिळेल
काँग्रेसची बैलजोडी, गाय-वासरू याबाबत जे निकाल लागलेत. त्यात जे निकष लागले त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना न्याय मिळेल. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंनाच मिळेल. एकूण आमदार किती? एका आमदाराला, खासदाराला मिळालेली मते अशी मोजली जातात. शिंदेंसोबत ५० आमदार आणि १३ खासदार आहेत. ठाकरेंकडे १४ आमदार आहेत. नियमानुसार एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल यावर शिक्कामोर्तब झालं पाहिजे असं मला वाटतं असं रामदास कदमांनी म्हटलं.
अनिल परब बोगस वकील
संजय राऊत सकाळपासून रात्रीपर्यंत ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी संघर्ष करतायेत. त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. १४ तारखेला निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल. त्यांच्या आजुबाजूला ते अनिल परबसारखे वकील आहेत ते त्यांना कसं फसवतायेत हे लक्षात येईल. आमचा पक्ष बाळासाहेबांचा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमची घटना झालेली आहे. नियमाप्रमाणे आमचं काम सुरू आहे. आम्ही गाफील नाही. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्या. आमच्याकडे अनिल परब यांच्यासारखे बोगस वकील नाहीत असं सांगत कदमांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला.
आमदार नाराज नाहीत, जनता खुश आहे
प्रत्येक आमदाराला वाटतं मंत्री झालं पाहिजे. ते स्वाभाविक असते. आमच्याकडे कुणी नाराज नाही. फक्त मंत्रिपद मिळावे म्हणूनच आले असं नाही. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात विकासाचं ध्येय एकनाथ शिंदेंनी ठेवले आहे. कुठल्याही आमदाराला मी पडू देणार नाही. त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी जे काही खोके द्यायचे आहेत ते सगळे देईन असं आहे. मविआ काळात शिवसेना आमदारांना निधी मिळत नव्हता. म्हणून आमदार नाखुश होते. आता विकासकामाला सुरुवात झालीय. त्यामुळे जनता खुश आहे असं सांगत मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास कदमांनी भाष्य केले.