१००% वाट लागली! रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपने शिवसेनेत 'वादळ', सोमय्यांना दिले अनिल परबांविरोधातील पुरावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 05:08 PM2021-10-02T17:08:12+5:302021-10-02T17:35:43+5:30
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते किरिट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप केले आहेत. यामागे शिवसेनेच्याच बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. (ShivSena Leader Ramdas Kadam gave information about Anil Parab resort to Kirit Somaiya)
एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्यांचा संवाद आहे. अनिल परब यांचं वांद्र्यातलं कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात येणार आहे. न्यायालयानं तसे आदेश दिलेत, असा दोघांमधला संवाद आहे. या आदेशाची प्रत कधी मिळेल अशी विचारणा कर्वे करतात. त्यावर दोन दिवसांत मिळेल, असं उत्तर सोमय्यांनी दिलं आहे. यानंतर हे संभाषण कर्वे रामदास कदमांच्या कानावर घालतात. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना (अनिल परब) राजीनामा द्यावा लागेल, असं कदम म्हणतात. मनसेचे नेते आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या ऑडिओ क्लिप पुढे आणल्या आहेत.
शिवसेना नेते रामदास कदम त्यांच्या हस्तकाच्या माध्यमातून अनिल परबांविरुद्धची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांना पुरवतात. रामदास कदम महाविकास आघाडीचे सूर्याजी पिसाळ; राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार संजय कदम यांचे रामदास कदमांवर गंभीर आरोप https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/xG9WWItDRv
— Lokmat (@MiLOKMAT) October 2, 2021
रिसॉर्ट पाडण्यासाठीही कदमांनी पुरवली रसद?
अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातही रामदास कदम यांनीच सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमय्यांनी गुन्हा दाखल केला आहे, असं कर्वे कदमांना फोनवर सांगतात. दिल्लीची टीम रिसॉर्टच्या पाहणीसाठी आली आहे, अशी माहितीदेखील कर्वे कदमांना देतात. त्यावर मग तर आता हा मेला. वाट लागली. कारण ते बांधकाम १०० टक्के सीआरझेडमध्ये येतं, असं कदम म्हणतात.
ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदम
मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.