Ramdas Kadam: रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र; वाचा जसच्या तसं...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 02:06 PM2021-12-18T14:06:28+5:302021-12-18T14:18:12+5:30
Anil Parab vs Ramdas Kadam: शिवसेनेला राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारा अनिल परब गद्दार की रामदास कदम? असा सवाल रामदास कदमांनी शिवसैनिकांना विचारला आहे.
मुंबई – माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहे. ते स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्यासारखं वागतायेत. अनिल परब यांनी कदम कुटुंबीयांना राजकारणातून संपवण्याचा डाव आखला. रामदास कदम यांच्याविरोधात कटकारस्थान करण्यात आली असा आरोप कदमांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील कदमविरुद्ध परब हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटंल की, अनिल परबांनी माझ्या मुलाला विधानसभेचे तिकिट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमांना तिनदा मातोश्रीवर घेऊन आले. योगेश कदमांवर सुडाची भावना ठेऊन पालकमंत्री अनिल परब यांनी काम केले. मंत्रिपद मिळाल्यापासून अनिल परब शिवसेनेशी गद्दारी करतायेत, स्थानिक आमदाराला डावललं जातंय. शिवसेनेला राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारा अनिल परब गद्दार की रामदास कदम? असा सवाल त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे.
रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र
आदरणीय शिवसेनाप्रमुख,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
कोरोनाकाळात मागील दीड वर्षापासून आपल्या संपर्कात येऊ शकलो नाही. मी ३ महिने ऑक्सिजनवरती होतो. मरणाच्या दारातून परत आलो. त्यावेळी आपण माझी चौकशी करत होतात. ब्रीचक्रॅन्डी हॉस्पिटलला फोन लावून डॉक्टरांना सूचना देखील दिल्या होतात. त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
उद्धवजी, १९७० सालापासून भगव्या झेंड्याचा शिपाई म्हणून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून ५२-५३ वर्ष शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहे. याचे साक्षीदार आपण आहात. कोकणातील काही राजकीय पुढाऱ्यांना माझी अडचण होत असल्यामुळे काही बिनबुडाच्या बातम्या छापून आणल्या जातात. नुकतीच ८ दिवसांपूर्वी ग्रामीण लोकमत वर्तमान पत्रामध्ये शिवसेनेचा भावी मंत्री भाजपामध्ये जाणार अशीही बातमी आहे.
या बातम्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराकडून छापून आणल्या जातात. त्याला मार्गदर्शन शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनच केले जाते. उद्देश फक्त हाच की माझ्यावर तुमचा विश्वास राहू नये. माझ्या बाबतीत. तुमच्या मनात गैरसमज निर्माण व्हावा व त्याची आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकणामध्ये सध्या काही पुढाऱ्यांचं काम सुरु आहे.
आम्हा जुन्या नेत्यांना मंत्री पद दिले नाही त्याचे कुठे ही दु:खं नाही. पक्षाने मला पुष्कळ काही दिले आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या मुलाला तिकिट देऊ नका व राष्ट्रवादीच्या आमदाराला जो मातोश्रीवर घेऊन आला होता व त्याचा तिकिट द्या असे सांगणारा तुमचा विश्वासू म्हणून महाराष्ट्र ओळखतो व ज्याला मंत्री केले आहात तोच पुढारी त्याच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याला हाताशी पकडून मला कोकणातून संपवण्याचं राजकारण करत आहे का? हे आपण तपासून पाहावे, खात्री करुन घ्यावी.
मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगेन की, मी मरेन तो भगव्यामध्येच, मरेपर्यंत पक्षाची व भगव्याशी बेईमानी माझ्याकडून कदापी होणार नाही. कुणी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मनात गैरसमज होता कामा नये म्हणून पत्रप्रपंच आपण चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांना कधीतरी वेळ दिलात तर विचारांची देवाणघेवाण होईल. उद्धवजी, पुन्हा आपल्याला हात जोडून सांगतो आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्री पद दिलेत. ते पक्ष वाढीसाठी काम करायला सांगणे, कुणाची घरे फोडणे व शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरुण संपवणे हे काम चालले आहे. हे कृपा करुन थांबवायला सांगा ही विनंती.
सूर्यकांत दळवी वारेमाप माझ्यावरती टीका करतो. ग्रामपंचायत निवडणूक , पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत मागील ४ वर्षापासून काम करत आहेत. नुकताच नारायण राणे यांच्या जनयात्रेतही त्यांनी आवर्जुन हजेरी लावली. या सूर्यकांत दळवी यांची पक्षातून हकालपट्टी का होत नाही याचे आकलन होत नाही.
वैभव खेडेकर मनसेचा नगराध्यक्ष याच्या भ्रष्टाचाराला आपलेच मंत्री खतपाणी घालतात त्याला मदत करतात मग आपल्या मंत्र्याचा हेतू काय? फक्त रामदास कदम याला संपवणे असाच आहे काय असाही प्रश्न पडतो. उद्धवजी, अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसोर्टचे प्रकरण गाजत आहे. त्या साई रिसोर्टच्या उद्धाटनाच्या पूजेला राष्ट्रवादीचा माजी आमदार आणि मनसे नगराध्यक्ष कसा जातो? फोटोसह आपल्याला पुरावे देईन, मी आम्ही नेमके काम करायचे? मात्र मी शिवसेनेचा नेता आहे त्याचे भान आहे. त्यामुळे आजपर्यंत किरिट सोमय्या यांच्याकडे कधीही संपर्क साधला नाही. बोललो नाही. काहीही त्यांच्याकडे संबंध नाही याचाही खुलासा करावयाचा वाटतो.
जे मंत्री हरामखोरी करत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा, रामदास कदमला संपवण्याचा घाट घातला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी ही विनंती.
टीप – सविस्तर भेटी अंती बोलू
आपला विश्वासू
रामदास कदम