...हे मर्दानगीचं लक्षण नाही; रामदास कदम चिडले, सुभाष देसाईंना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 02:36 PM2022-08-03T14:36:12+5:302022-08-03T14:39:24+5:30
उत्स्फुर्त प्रतिक्रिया देणाऱ्यांची प्रतिमा संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे. फार झंझावात आणि वाघासारखा नेता आहे असा टोला कदमांनी लगावला आहे.
मुंबई - काहींच्या हाती काही नसल्याने हल्ला करणे तेवढेच काम आहे. उदय सामंत असो वा अन्य आमदार यांनी याकडे लक्ष न देता मतदारसंघाचा विकास, महाराष्ट्राचा विकास यासाठी कामाला लागावे. अंगावर आले शिंगावर घ्यायचे ही शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिली आहे. आमच्यासाठी नवीन नाही. हा भ्याडपणाचा हल्ला आहे अशा शब्दात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी निशाणा साधला आहे.
रामदास कदम म्हणाले की, अशाप्रकारे भ्याडपणे हल्ला करणे, हाताला दगड बांधून काच फोडायची ही मर्दानगीचे लक्षण नाही. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मी काही बोलणार नाही. परंतु उत्स्फुर्त प्रतिक्रिया देणाऱ्यांची प्रतिमा संबंध महाराष्ट्राने पाहिली आहे. फार झंझावात आणि वाघासारखा नेता आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढलेला माणूस जागा होऊन बोलतोय त्याचे आश्चर्य वाटते अशा शब्दात कदम यांनी सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला.
बहुमत ज्याच्याकडे ते ग्राह्य धरले जाईल
विधिमंडळात ज्याच्याकडे बहुमत असते ती ग्राह्य मानली जाते असा माझा अभ्यास आहे. परंतु न्यायालयाच्या बाबतीत टिप्पणी करणं योग्य नाही. एकाबाजूला १५ आमदार आणि दुसऱ्या बाजूला ५१ आमदार इतकी मोठी तफावत आहे. त्याच्यामुळे नियमानुसारच निर्णय होईल असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. तसेच कायदेशीर बाबी आहेत त्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही असंही कदम यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मध्यरात्री पुणे पोलीस आयुक्तांना या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. तर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांना देखील मुंबईतून ताब्यात घेतले आहे.