'शिवसेनेनं आजवर रामदास कदम यांना खूप काही दिलं'; मुलगा योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:40 PM2021-11-05T12:40:03+5:302021-11-05T12:40:19+5:30
रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यावर आमदार योगेश कदम यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
रत्नागिरी: मागील काही दिवसांपासून एका कथित ऑडियो क्लिपमुळे शिवसेना पक्षश्रेष्ठी रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपासून झालेल्या दसरा मेळाव्यातही रामदास कदम आले नव्हते, त्यामुळे नाराजीच्या चर्चा वाढल्या. यानंतर रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण, आता या सर्व नाराजी नाट्यावर रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंचे आमच्यावर प्रेम
माध्यमांशी संवाद साधताना योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या विधान परिषदेच्या जागेबद्दल सूचक वक्तव्यं केलं आहे. ते म्हणाले, वयाच्या 18व्या वर्षापासून रामदास कदम यांनी एकनिष्ठेने पक्षाची कामे केली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. राहिला प्रश्न त्या ऑडिओ क्लिपचा, तर रामदास कदम यांनी स्वतः त्या ऑडिओ क्लिपबाबत खुलासा केला आहे. ऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी संपलाय, त्यामुळे पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरेंचे आमच्यावर प्रेम आहे आणि आदित्य ठाकरे यांचे आमच्याशी वेगळे नाते आहे. आमच्या संबधामध्ये विरोधकांनी कटुता आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात कधीच यश येणार नाही, असं योगेश कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे नाराज नाहीत...
योगेश कदम पुढे म्हणाले की, पक्षश्रेष्ठी रामदास कदम यांच्यावर नाराज नाहीत, नाराजीचा प्रश्नच नाही. पक्षानं आतापर्यंत रामदास कदम यांना खूप दिलं आहे. रामदास कदम यांनी आजवर पक्षासाठी झोकून काम केल आहे. शेवटी विधान परिषदेचं तिकीट कुणाला द्यायचं हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, त्यांचा निर्णय अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. आमच्यासाठी शिवसैनिक हेच महत्वाचे पद आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्याकडे पाहताना रामदास कदम यांचे चिरंजीव म्हणून पाहतात, असंही आमदार योगेश कदम म्हणाले.