रामदास कदम यांना शिवसेनेचा पुन्हा झटका; परिवहन मंत्री अनिल परबांनी सूत्र फिरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:25 AM2021-12-16T11:25:32+5:302021-12-16T11:25:53+5:30

दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाल्यापासून पालकमंत्री अनिल परब गप्प होते.

Ramdas Kadam's supporters removed from party posts, Shiv Sena stood behind Anil Parab | रामदास कदम यांना शिवसेनेचा पुन्हा झटका; परिवहन मंत्री अनिल परबांनी सूत्र फिरवली

रामदास कदम यांना शिवसेनेचा पुन्हा झटका; परिवहन मंत्री अनिल परबांनी सूत्र फिरवली

googlenewsNext

दापोली : नगर पंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने दापोली, मंडणगडमधील वातावरण अधिकच रंगतदार होऊ लागले आहे. पक्षाची शिस्त पाळली नाही, असे कारण देत शिवसेनेच्या तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला असून, चार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नारळ देण्यात आलेले तीनही पदाधिकारी शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्याशी जवळीक असलेले आहेत आणि नियुक्त झालेले चारही नवीन पदाधिकारी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याशी जवळीक असलेले आहेत. या नव्या घडामोडींमुळे पालकमंत्री अनिल परब यांनी रामदास कदम, योगेश कदम यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे, असे मानले जात आहे.

दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाल्यापासून पालकमंत्री अनिल परब गप्प होते. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्यांनी कदम यांच्या गटाविरोधात जोरदार निर्णय घेणे सुरू केले आहे. प्रथम आमदार योगेश कदम यांच्याऐवजी दापोली, मंडणगड निवडणुकीची सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कदम गटाला हा मोठा धक्का होता. माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे वितुष्ट आहे. ते अनेकदा जाहीरपणे समोरही आले आहे. त्यामुळे कदम यांच्याकडील सूत्रे दळवी यांच्याकडे देण्यामागे शिवसेना नेतृत्त्वाने कदम गटाचे पंख कापण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट आहे.

ज्यावेळी योगेश कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात वावरणे सुरू केले, निवडणुकीची तयारी सुरू केली, तेव्हा त्यांनी पदाधिकारी बदलण्यापेक्षा आहेत, त्या पदाधिकाऱ्यांना आपलेसे करण्यावर भर दिला. पूर्वी जे सूर्यकांत दळवी यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते, त्या लोकांना योगेश कदम यांनी जवळ केले. त्यामुळे आताची पक्षीय फळी योगेश कदम यांच्या जवळची आहे. त्यामुळेच त्यांना बाजूला करुन तेथे दळवी यांच्याशी जवळीक असलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यावर भर देण्यात आला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीशी आघाडी करुन निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यानंतर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था होती. योगेश कदम यांनी निवडलेल्या उमेदवारांना निवडणुकीची संधी न मिळता इतर उमेदवारांना संधी मिळाली. त्यामुळे कदम यांनी निवडलेले उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत पक्षाची शिस्त पाळली जात नाही, असा ठपका ठेवून अखेर उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे आणि शहरप्रमुख राजू पेटकर या तिघांना नारळ देण्यात आला आहे. त्याजागी आता उपजिल्हाप्रमुख पदावर राजू निगुडकर, तालुकाप्रमुख पदावर ऋषिकेश गुजर तर शहर प्रमुख संदीप चव्हाण यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे यांनी गेल्याच महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या जागी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किशोर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दापोलीतील पक्षीय मेळाव्यात पालकमंत्री अनिल परब यांनी तशी घोषणा केली आहे.

रामदास कदमांना शिवसेनेचा झटका

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात शिवसेना नेते रामदास कदम यांनी माहिती पुरवल्याचा आरोप झाला. त्यानंतर रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यामुळे रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेना नेतृत्वाची नाराजी वाढतच गेली. शिवसेना दसरा मेळाव्यातही कदम गैरहजर होते. इतकचे नाही तर विधान परिषद निवडणुकीत रामदास कदम यांचा पत्ता कट करत त्यांच्या ऐवजी सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. आता रामदास कदम यांच्या समर्थकांकडून पद काढून शिवसेनेने कदमांना मोठा झटका देत पक्ष अनिल परब यांच्या पाठिशी असल्याचं ठामपणे दाखवून दिलं आहे.

Web Title: Ramdas Kadam's supporters removed from party posts, Shiv Sena stood behind Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.