रामदेवबाबांचा नागपुरात ‘उद्योग योग’
By admin | Published: August 10, 2016 04:48 AM2016-08-10T04:48:29+5:302016-08-10T04:48:29+5:30
योगगुरु बाबा रामदेव यांच्या उद्योग विश्वाची महाराष्ट्रातील मुहूर्तमेढ नागपुरात रोवली जाणार असून तेथील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पात
मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांच्या उद्योग विश्वाची महाराष्ट्रातील मुहूर्तमेढ नागपुरात रोवली जाणार असून तेथील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पात त्यांच्या कृषी-वन उत्पादनांच्या उद्योगासाठी २२५ एकर जागा देण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.
नागपुरात वन-कृषी क्षेत्रावर आधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी केली होती. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने त्यासाठी तयारी दर्शविली.
या प्रकल्पासाठी चारवेळा निविदा काढण्यात आली. चवथ्या निविदेत पतंजली समूहाची एकट्याचीच निविदा आल्याने नियमानुसार आता त्यांना हे काम देण्याचा निर्णय घेतला जाईल. सर्व नियम तपासूनच आम्ही या बाबतचा निर्णय घेऊ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी विदर्भातील शेतकऱ्यांकडून दरवर्षी किमान १०० कोटी रुपये किमतीची कृषी आणि वन उत्पादने पतंजलीकडून खरेदी करण्यात येणार आहेत. कमीतकमी एक हजार जणांना रोजगार दिला जाईल. त्या सोबतीने पॅकेजिंग उद्योग, वाहतूक व्यवसायाला गती मिळणार आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भाला या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळेल.
या प्रकल्पासाठी मिहानमधील बिगर एईझेड क्षेत्रातील २२५ एकर जागा देण्यात येणार आहे. त्यासाठीची शासनाने निश्चित केलेली रक्कम पतंजली समूहाला भरावी लागणार आहे.
बाबा रामदेव यांचे उद्योग विश्व अत्यंत झपाट्याने वाढत आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती असल्याने येथे मोठे उद्योग विश्व उभारण्याचा पतंजली समूहाचा विचार आहे. त्याची मुहूर्तमेढ म्हणून या प्रकल्पाकडे बघितले जात आहे. (विशेष प्रतिनिधी)