रामदेव बाबांचा ‘राज’योग

By admin | Published: May 18, 2017 02:58 AM2017-05-18T02:58:31+5:302017-05-18T02:58:31+5:30

योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. ही केवळ भेट सदिच्छा भेट होती

Ramdev Baba's 'Raj' yoga | रामदेव बाबांचा ‘राज’योग

रामदेव बाबांचा ‘राज’योग

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. ही केवळ भेट सदिच्छा भेट होती, असा दावा मनसेने केला असला, तरी रामदेव बाबांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना ‘राज’भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.
बुधवारी सकाळी साधारण ८:४५च्या सुमारास बाबा रामदेव ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. त्यानंतर बाबा रामदेव आणि राज ठाकरे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा रंगली. भाजपा आणि बाबा यांच्यातील जवळीक सर्वश्रृत असल्याने ही भेट राजकीय तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राज आणि बाबा रामदेव यांची ही भेट सकाळी ८ वाजता होणार होती; पण अचानक बाबा रामदेव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भेटीचे निमंत्रण आले. त्यामुळे बाबा रामदेव यांनी आधी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते कृष्णकुंजवर दाखल झाले.
बाबा रामदेव यांना भेटून आनंद झाला. हिंदू संस्कृतीतील योगाचे आणि आयुर्वेदाचे भारताने पाहिलेले हे सर्वात मोठे जागतिक प्रचारक आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी बाबा रामदेव यांच्या भेटीबाबत आनंद व्यक्त केला. तर टिष्ट्वटरद्वारे या भेटीबाबत सांगताना बाबा रामदेव म्हणाले की, राज यांची भेट झाली त्या वेळी त्यांच्या मुलाच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली आणि ठाकरे कुटुंबीयांना प्राणायामाचेही धडे दिले.

- राज यांचे पुत्र अमित गेल्या काही काळापासून आजारी आहेत. त्यांच्यावर योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून काही उपचार करता येतात का, याबाबत राज यांनी बाबा रामदेव यांचा सल्ला घेतला असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Ramdev Baba's 'Raj' yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.