अन रामदास आठवले मुख्यमंत्री बनले
By admin | Published: February 11, 2016 03:43 AM2016-02-11T03:43:09+5:302016-02-11T09:08:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपाला आठवले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपाला आठवले यांना मंत्री करण्याची कोणतीच घाई नाही. असे असले तरी आठवले आता थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरूढ होणार आहेत.
नगर जिल्ह्यातील युवा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या ‘कन्यारत्न’ नावाच्या चित्रपटात रामदास आठवले मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत. मुलगी वाचवा, मुलगी जगवा, शिकवा असा सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे शूटिंग कर्जत व शिरूर परिसरात झाले. पांढरा झब्बा आणि ब्लॅक जॅकेट परिधान केलेल्या आठवलेंनी कॅमेऱ्यासमोर मुख्यमंत्र्याची भूमिका वठवली. रामदास आठवलेंसोबतच या चित्रपटात रासपचे नेते महादेव जानकर, राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील आदी नेते पाहुणे कलाकार असणार आहेत.
या चित्रपटाबाबत बोलताना शिवाजी दोलतडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेसाठी चर्चेतील चेहरा हवा होता. तेव्हा आठवले या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती वाटले. आठवले यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांच्या आॅफर नाकारल्या आहेत. मात्र, हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असल्याने त्यांनी होकार दिला व आम्हाला मुख्यमंत्री मिळाले. (प्रतिनिधी)