रामदेव यांना स्वस्तात जमीन? प्रश्न विचारणा-या अधिका-याची बदली
By admin | Published: March 8, 2017 10:25 AM2017-03-08T10:25:53+5:302017-03-08T11:32:51+5:30
योगगुरु बाबा रामदेव यांना नागपूरमध्ये फूडपार्क उभारण्यासाठी दिलेल्या जागेवर 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागच्यावर्षी घेतला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - योगगुरु बाबा रामदेव यांना नागपूरमध्ये फूडपार्क उभारण्यासाठी दिलेल्या जागेवर 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागच्यावर्षी घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित करणा-या एका वरिष्ठ सरकारी अधिका-याची बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिजय कुमार असे या अधिका-याचे नाव असून आर्थिक सुधारणा विभागाचे ते प्रधानसचिव होते.
इतक्या कमी किंमतीत जागा देण्याच्या निर्णयावर बिजय कुमार यांनी लिखितमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांची 29 एप्रिल 2016 रोजी बदली करण्यात आली. सरकारी अधिका-याला सर्वसाधारणपणे तीन वर्षांचा कार्यकाळ मिळतो पण दीडवर्षांच्या आतच कुमार यांची बदली झाली. बिजय कुमार सध्या कृषी खात्याचे प्रधानसचिव आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बोर्डाचे प्रमुख आहेत. त्यांनीच या व्यवहाराला मंजुरी दिली. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. बिजय कुमार यांची झालेली बदली नियमित होती. त्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी पोस्टींग देण्यात आली असे त्यांनी सांगितले.
मिहानमधल्या फुडपार्कसाठी जमिनीची किंमत किती असावी याचा सल्ला चार सदस्यीय उपसमिती देणार होती. बोर्ड या समितीच्या सल्ल्यावर अवलंबून होते. बिजय कुमार हे त्या चार सदस्यीय समितीमध्ये होते. नागपूरमध्ये प्रति एकर जागेची किंमत 1 कोटी होती. उपसमितीने फूडपार्कसाठी प्रति एकरची बेस किंमत 25 लाख असावी अशी शिफारस केली. ऑगस्ट 2016 मध्ये पतांजली आयुर्वेद लिमिटेडला 58.63 कोटींना 66 वर्षांच्या भाडेतत्वावर 230 एकरची जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.