रमेश कदमला २८पर्यंत कोठडी

By admin | Published: September 16, 2015 12:35 AM2015-09-16T00:35:54+5:302015-09-16T00:35:54+5:30

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम याला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष

Ramesh Kadam up to 28 storied | रमेश कदमला २८पर्यंत कोठडी

रमेश कदमला २८पर्यंत कोठडी

Next

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम याला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष व जिल्हा न्यायाधीशांनी आज दिला. महामंडळात ३८५ कोटी रुपयांचे घोटाळे कसे झाले याची जंत्रीच विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मंगळवारी न्यायालयात सादर केली. ‘लोकमत’ने यापूर्वीच घोटाळ्याचा तपशील प्रसिद्ध केला आहे.
रमेश कदमने पेडररोडला घेतलेल्या भूखंडाबाबत नवीन खुलासा आता समोर आला आहे. हब टाऊन कंपनीची उपकंपनी असलेल्या कुमराल रिअ‍ॅलिटी इस्टेट प्रा. लि. कंपनीच्या नावावर हा ८०० चौरस मीटरचा भूखंड होता. आ. कदम आणि त्याचा पीए विजय कसबे यांनी या कंपनीचे १०० टक्के शेअर खरेदी केले. त्यासाठी महामंडळाकडून तब्बल ९६ कोटी रुपये हब टाऊन आणि कुमराल कंपनीकडे वळते करण्यात आले.
औरंगाबाद येथे यूपीएससी/ एमपीएससी मार्गदर्शन केंद्राकरता जमिनीची खरेदी करण्यासाठी ११ कोटी ४० लाख रुपये महामंडळाकडून कोहली या व्यक्तीला देण्यात आले. प्रत्यक्षात २ एकर जमीन ही कदमच्या नावावर खरेदी करण्यात आली. मैत्री शुगरला दिलेल्या ३० कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये हब टाऊन कंपनीकडे वळविण्यात आले. उर्वरित ५ कोटी रुपयांत कमलाकर ताकवाले आणि गाडेकर या आपल्या दोन सहकाऱ्यांच्या नावाने वळविण्यात आले. जोशाबा ग्राहक संस्थेला दिलेल्या ४१ कोटी रुपयांमध्ये १० कोटी रुपये हे संतोषी सिव्हिल कंपनीला देण्यात आले. कुमराल कंपनीला ८ कोटी रुपये वाटले. ५ कोटी रुपये कदमने स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यात टाकले. १ कोटी ३० लाख रुपये हे तिरुपती एंटरप्रायजेसला दिले. ७२ लाख रुपये स्टर्लिंग मोटर्स या फर्मला देण्यात आले. ७१ लाख रुपयांत येवला-नाशिक मार्गावर कदमने जमीन खरेदी केली. बोरीवली येथे त्याने २ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला आणि बीड बायपास; औरंगाबाद येथे ११.५० कोटींची जमीन खरेदी केली. याशिवाय, महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली १४८ कोटी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आले.
या सगळ्यांची माहिती अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयात सादर केली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ramesh Kadam up to 28 storied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.