राष्ट्रवादीचे फरार आमदार रमेश कदम अखेर अटकेत
By Admin | Published: August 17, 2015 09:19 AM2015-08-17T09:19:02+5:302015-08-17T16:54:08+5:30
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी पहाटे पुण्यातील ग्रँड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ -अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी पहाटे पुण्यातील ग्रँड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु झालेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यावधींचा घोटाळा झाला होता. 'लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या घोटाळ्याच्या अनेक सुरस कथा समोर आल्या असून याप्रकरणी आ. कदम आणि इतर सात जणांवर १८ जुलै रोजी मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात १४७ कोटी रुपये कदमने निव्वळ स्वत:च्या फायद्यासाठी घेतल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले. उर्वरित रकमेत त्याच्यासह अनेक लाभार्थी असून, त्यात मातंग समाजाचे काही प्रतिष्ठित नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी मंत्री, आमदार, माजी आमदारांचा समावेश आहे.
२० जुलैपासून पोलिसांचे पथक रमेश कदम यांच्या मागावर होते. अखेरीस सोमवारी पहाटे पुणे - नगर रोडवरील ग्रँड ह्यात हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने कदम यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.