रमेश कदम जेरबंद!

By admin | Published: August 18, 2015 02:32 AM2015-08-18T02:32:12+5:302015-08-18T02:32:12+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचा आमदार आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम

Ramesh Kadam wound up! | रमेश कदम जेरबंद!

रमेश कदम जेरबंद!

Next

यदु जोशी / टीम लोकमत , मुंबई / पुणे / नवी मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचा आमदार आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम याला काल मध्यरात्रीनंतर २ वाजता पुणे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष पथकाने अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल एक महिना फरार असलेला कदम अखेर जेरबंद झाला. या घोटाळ्याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केला; आज त्याच्या अटकेने एक वर्तूळ पूर्ण झाले.
कदम याला सोमवारी मुंबईतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी त्याला २५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. २०१२ ते २०१४ या काळात
२० महिने महामंडळाचा अध्यक्ष असताना कदमने केलेल्या महाभयंकर भ्रष्टाचाराचा पाढा सीआयडीच्या वकिलांनी आज न्यायालयात वाचला आणि प्रत्येक वाक्यागणिक ‘लोकमत’ने उघड केलेल्या घोटाळ्याला दुजोरा दिला. कदमला कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. कदम फरार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सीआयडी त्याच्या मागावर होती; अखेर त्यांना यश मिळाले. कदम याच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती; पण त्याआधीच त्याला अटक झाली.
कदम आणि इतर सहा जणांविरुद्ध १८ जुलै रोजी मुंबईच्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात कदमच्या दोन बहिणींसह चार जणांना अटक करण्यात आली पण महामंडळाचे दोन माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष इंगळे आणि एस.के.बावणे अद्याप फरार आहेत. अटकेनंतर सीआयडीने कदमची तब्बल सात तास कसून चौकशी केली.
मला काहीच त्रास नाही
अटक झाल्यापासून मला सीआयडीकडून कोणताही त्रास देण्यात आलेला नाही. सीआयडीबद्दल माझी काहीही तक्रार नाही, असे कदम याने न्यायालयात सांगितले. ‘सीआयडीकडून काही त्रास दिला जात आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी त्याला विचारला होता.

लोकमतने यावर टाकला झगझगीत प्रकाश
- कदम महामंडळाचा अध्यक्ष असताना जोशाबा ग्राहक संस्था, अण्णाभाऊ साठे सूतगिरणी आणि मैत्री शुगर या तीन संस्थांना १४२ कोटी रुपये महामंडळाकडून देण्यात आले. तिन्ही संस्थांचा अध्यक्ष स्वत: कदमच होता. यातील मोठा पैसा नंतर आपल्या कंपनीकडे वळविला.
- मातंग समाज महिला समृद्धी योजनेच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या ३८ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपये या प्रमाणे तब्बल १९० कोटी रुपये वाटण्यात आले. यात अनेक बोगस प्रकरणे करून पैशांची लूट करण्यात आली.
- तब्बल ८६ कोटी रुपये आरटीजीएस आणि बेअरर चेकने महामंडळाच्या सहा कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी काढले; हा पैसा दमदाटी करून पळविल्याचा आरोप. कदम, त्याचे साथीदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे उघड. यातील एकाही पैशाचा अद्याप पत्ता नाही.
-महामंडळात अर्ज, मुलाखती न होताच ६० जणांना स्थायी नोकरी. प्रत्येकाकडून २० लाख रुपये घेण्यात आले. अशाप्रकारे १२ कोटी रुपयांची कमाई. हा पैसा महामंडळाकडून गृहकर्जाच्या स्वरुपात घेण्यात आला.
- कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीची निम्मी रक्कम (१ कोटी २ लाख रु.) उकळली; त्याच्या पावत्या कर्मचाऱ्यांना दिल्या.
-८ ते २० लाख रुपये किमतीच्या अलिशान गाड्या ६० जणांना गिफ्ट म्हणून दिल्या. त्यात राष्ट्रवादीचे नेते, समाजसुधारकांचा समावेश.
-स्वत: कदमने बीएमडब्ल्यू, आॅडी अशा महागड्या गाड्या घेतल्या. मुंबईच्या पेडर रोडवर ८० कोटी रुपयांच्या भूखंडाची खरेदी.
- मोहोळ तालुक्यातील महालक्ष्मी दूध डेअरीला ५ कोटी ५० लाख रुपये दिले. हा पैसा आपल्या दोन बहिणींच्या खात्यात टाकला आणि तो पैसा नंतर स्वत:च्या कंपनीकडे वळविला.
————————————————-
कदमचा धक्कादायक प्रवास
बोरीवली भागातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या रमेश कदमचा प्रवास भल्याभल्यांना चकित करणारा आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रा.लक्ष्मण ढोबळे यांचा पीए म्हणून त्याने मंत्रालय पाहिले आणि मग त्याच्या ठायी राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. ढोबळेंचा निकटस्थ आणि नंतर प्रखर विरोधक बनत त्याने बस्तान बसविले. राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत बनत त्याने आपला प्रभाव वाढविला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याने उपकृत केले.
————————————————-
पवारांना काळे झेंडे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी परभणी दौऱ्यावर असताना लाल सेनेचे नेते कॉ. गणपत भिसे यांच्या नेतृत्वात त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर निदर्शने करण्याचे मातंग समाज संघटनांनी ठरविले होते. राज्यभर तीव्र पडसाद उमटण्याआधीच कदमला अटक झाली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी राज्यभर यात्रा सुरू केली असून महामंडळातील घोटाळ्यांवरून ते स्वपक्षीयांवर तोफ डागत आहेत.
————————————————
रमेश कदम काल सायंकाळी नवी दिल्लीहून विमानाने पुण्याला आला. तेथून रात्री तो पुणे-नगर मार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला. सीआयडीच्या विशेष पथकाला त्याच्या या हालचालींबाबत टिप्स मिळाल्या. त्यानुसार, डीवायएसपी शीतल राऊत आणि त्यांची टीम दबा धरून बसली होतीच. कदमला तेथे जेरबंद करण्यात आले. तेथून त्याला रातोरात नवी मुंबईतील सीआयडी कार्यालयात आणले गेले.
एक महिना फरार असताना कदम आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात लपतछपत फिरत होता. सीआयडीचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो दरदिवशी मुक्काम बदलयाचा,
अशी माहिती सूत्रांनी दिली.

समाजाकडून ‘लोकमत’चे आभार
‘लोकमत’ने चालविलेल्या वृत्तमालिकेने हा घोटाळा जगासमोर आला. राज्यातील तमाम मातंग समाजाने त्यासाठी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. आभाराचे अनेक फोन ‘लोकमत’कडे आले. ‘दीनदलित मातंग समाजाच्या हक्काचा पैसा खाणाऱ्यांचा बुरखा फाडल्याबद्दल आम्ही ‘लोकमत’चे ऋणी आहोत, अशी भावना असंख्य बांधवांनी व्यक्त केली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ््यासंदर्भात कायदा आपले काम करीलच; पण राज्याच्या तिजोरीची आणि सार्वजनिक पैशांची अशाप्रकारे लूट करण्याची हिंमत कुणी करणार नाही, हे आम्ही बघू.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पक्षातून हकालपट्टी?
कदम यांच्यावर पक्षाकडून होणाऱ्या कारवाईचे स्वरूप येत्या दोन-तीन दिवसांत कळेलच, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. सर्व स्तरातून टीका होत असल्याने कदमची पक्षातून हकालपट्टी होईल, असे मानले जात आहे.

Web Title: Ramesh Kadam wound up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.