रमेश कदमचा ताबा नागपाडा पोलिसांकडे
By admin | Published: May 25, 2017 02:21 AM2017-05-25T02:21:49+5:302017-05-25T02:21:49+5:30
नातेवाइकांना भेटू न दिल्याच्या रागात पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या रमेश कदमला अखेर आठवड्याभराने अटक करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नातेवाइकांना भेटू न दिल्याच्या रागात पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या रमेश कदमला अखेर आठवड्याभराने अटक करण्यात आली आहे. नागपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित आमदार कदम हा भायखळा कारागृहात आहे. १८ मे रोजी सकाळी जे. जे. रुग्णालयात नेत असताना त्याला नातेवाइकांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. याच रागात त्याने तेथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा अहवाल पोलीस आयुक्तांना मिळताच, त्यांच्या आदेशाने १९ मे रोजी रात्री उशिराने कदमविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी याच गुन्ह्यात न्यायालयाच्या आदेशाने कदमला अटक करण्यात आली. तसेच त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.