रमेश उपाध्यायचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: November 13, 2016 02:22 AM2016-11-13T02:22:33+5:302016-11-13T02:22:33+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्यायचा जामीन अर्ज शनिवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितबरोबर मेजर रमेश
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्यायचा जामीन अर्ज शनिवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितबरोबर मेजर रमेश उपाध्यायने बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि मेजर रमेश उपाध्याय हे दोघेही अभिनव भारत या संघटनेचे सदस्य होते. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी भोपाळ, फरिदाबाद आणि अन्य ठिकाणी झालेल्या बैठकीत उपाध्याय हजर होता, असा आरोप राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) केला
आहे.
‘२५ व २६ जानेवारी रोजी फरिदाबादमध्ये एक गुप्त बैठक झाली. हिंदूंसाठी स्वतंत्र झेंडा (भगवा) आणि स्वतंत्र संविधान असण्याची आवश्यकता असल्याचे मत पुरोहितने बैठकीत व्यक्त केले आणि त्याला उपाध्यायने दुजोरा दिला होता. भारत सरकारविरुद्ध हिंदूंचे राष्ट्र निर्माण करण्याची इच्छाही पुरोहितने या बैठकीत व्यक्त केली होती,’ असे एनआयएन दोषारोपपत्रात म्हटले आहे.
मात्र उपाध्यायने हा आरोप फेटाळला आहे. संबंधित बैठकीत अभिनव भारत स्थापण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. एनआयएने दोषारोपपत्रात नमूद केलेल्या संवादाला काहीही अर्थ नाही. समाजात चाललेल्या गैरप्रकारांविषयी लोकांमध्ये चीड होती आणि बैठकीच्या निमित्ताने त्यांनी त्या रागाला मोकळी वाट करून दिली. या बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेवर कधीच कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होऊ शकत नाही. या बैठकीत मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याविषयी चर्चाच झाली नाही, असे उपाध्यायने जामीन अर्जात म्हटले आहे.
तपास यंत्रणेने अभिनव भारतच्या अध्यक्षांची व बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य समभासदांची चौकशी का केली नाही, असा प्रश्नही उपाध्यायने जामीन अर्जात उपस्थित केला आहे.
उपाध्यायच्या जामीन अर्जावर विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी आक्षेप घेतला. ‘बैठकीत मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याबाबत चर्चा करण्यात आली नसली तरी मुस्लीम समाजावर हल्ला करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. उपाध्याय आणि पुरोहितच्या फोनच्या कॉल डाटा रेकॉर्डवरून (सीडीआर) हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध झाले आहे. पुरोहितच्या कृत्यामुळे अभिनव भारतच्या अध्यक्षांनी आणि अन्य सदस्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले, असा युक्तिवाद अॅड. रसाळ यांनी विशेष न्यायालयात केला. एनआयए, एटीएसकडे उपाध्यायविरुद्ध असलेले सबळ पुरावे लक्षात घेत विशेष न्यायालयाने उपाध्यायचा जामीन अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)