रमेशचा मृतदेह धारावीत सापडला
By admin | Published: January 12, 2016 02:44 AM2016-01-12T02:44:30+5:302016-01-12T02:44:30+5:30
सेल्फीच्या नादात समुद्रात बुडालेल्या तरुणीचा जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतलेल्या जिगरबाज रमेश वळुंजचा मृतदेह सोमवारी धारावीच्या मिठी नदीकाठी आढळून आला.
मुंबई : सेल्फीच्या नादात समुद्रात बुडालेल्या तरुणीचा जीव वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतलेल्या जिगरबाज रमेश वळुंजचा मृतदेह सोमवारी धारावीच्या मिठी नदीकाठी आढळून आला.
धारावी येथील राजीव गांधी झोपडपट्टीलगत असलेल्या मिठी नदीकाठी सकाळी साडेआठच्या सुमारास हा मृतदेह स्थानिकांच्या नजरेत पडला. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांसह अग्निशमन दल तेथे दाखल झाले. मृतदेह गाळात रुतलेला असल्याने त्याला बाहेर काढण्यास तब्बल तीन तास लागले. अखेर स्थानिक तरुणांना पाण्यात उतरवून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास रमेशच्या नातेवाइकांना व्हॉट्स अॅपवर पोलिसांनी मृतदेह सापडल्याची माहिती दिली. रमेश जिवंत असेल, अशी त्याचे कुटुंबीय मनाची
समजूत काढत होते. पण मृतदेह पाहताच वळुंज कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. सायंकाळी ७च्या सुमारास रमेशचे पार्थिव वांद्रे येथील घराकडे आणण्यात आले. खारदांडा येथील स्मशानभूमीत रमेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
उद्धव ठाकरेंकडून वळुंज कुटुंबीयांचे सांत्वन... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रमेश वळुंजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांचे सांत्वन करत कुटुंबाला मदत करण्याची हमी त्यांनी दिली.
तरन्नुमचा शोध सुरू : जिगरबाज रमेश वळुंज या तरुणाने जिवाची पर्वा न करता अंजुम आणि मुश्तरीचे प्राण वाचवले. समुद्रात आतपर्यंत गेलेल्या तरन्नुमला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली होती. मात्र तिच्यासह तो समुद्राच्या प्रवाहात आत खेचला गेला. रमेशचा मृतदेह हाती लागला आहे. मात्र अद्याप तरन्नुमचा थांगपत्ता लागलेला नाही.