शरद पवारांसाठी राणेंचे विधिमंडळातून रामेश्वराला गाऱ्हाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 08:41 PM2017-08-04T20:41:28+5:302017-08-04T20:42:32+5:30
शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत गौरवौदगार काढताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पवार यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आपले कोकणातील कुलदैवत रामेश्वराला थेट विधिमंडळातून गाऱ्हाणे घातले.
मुंबई, दि. 4 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ राज्य विधिमंडळात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत गौरवौदगार काढताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पवार यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आपले कोकणातील कुलदैवत रामेश्वराला थेट विधिमंडळातून गाऱ्हाणे घातले.
राणे म्हणाले, "शरद पवार यांना अनेकवेळा जवळून पाहायची संधी मिळाली. पवार साहेब कोणत्या रसायनाने बनले आहेत. हे कळत नाही. पवार साहेबांनी 55 वर्षांत केलेले काम आणि कर्तुत्व हे राज्यासाठी मार्गदर्शक आहे. मी तर बोलतो शरद पवार हे चालते बोलते विद्यापीठ आहे. तास दोन तासात बोलून पुर्ण होऊन शकत नाही इतकं अथांग काम त्यांचे आहे. कोणताही विषय असो त्यात रस कसा घ्यायचा हे पवारांकडून शिकावे. ते वरुन हेलिकॉप्टर मधून जात असतील तरी महाराष्ट्रातला कोणता तालुका आहे, त्याचे प्रश्न काय आहेत ते तिथे बसून बोलून दाखवतात." जेव्हा शेतकरी आर्थिक सबळ जेव्हा होईल तेव्हा साहेबांच्या 55 वर्षाच्या कामाचे सार्थक होईल असे सांगत माझ्या कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करुन साहेबांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, असे गाऱ्हाणे राणेंनी घातले.
"पवार साहेबांनी 55 वर्षात विविध क्षेत्रासाठी जे योगदान दिले आहे, ते क्वचितच इतर व्यक्ती देऊ शकेल. राजकीय मतभेद असले तरी पवार साहेबांचे कर्तृत्व कुणीही नाकारू शकत नाही. मी शासनाचा आभारी आहे की पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला गेला. आदर्श प्रतिनिधी व्हायचे असेल, आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर पवार साहेबांना जाणून घ्यावे लागेल. माझे आवडते नेते बाळासाहेब आहेत. पण मला विचाराल राजकारणातला आवडता नेता कोण विचाराल तर शरद पवार." असेही राणे पुढे म्हणाले.