राममंदिराचा कळस उतरला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
By Admin | Published: September 28, 2016 07:35 AM2016-09-28T07:35:30+5:302016-09-28T07:35:30+5:30
मुसलमानांना मिठ्या मारा असे मोदी यांनी सांगताच त्यांचे शब्द जिभेवर विरघळण्याआधीच मुसलमानी मोर्चाचा बॉम्ब फुटावा, हे कसले लक्षण असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मुसलमानांना गाठीशी बांधून राजकारण करणार्यांची एक नवी ‘पेढी’ निर्माण झाली व त्यात राममंदिराचा कळस उतरला हेच आता दिसते. मुसलमान हा देशाचा सदासर्वदा दुश्मन नाही, पण हिंदूंना त्यांच्यामुळे त्यांच्याच हिंदुस्थानात मान-अधिकार मिळत नाही व सरकारे बदलली तरी मुसलमानी लांगूलचालनाचे नवे प्रयोग घडतच आहेत. मुसलमानांना मिठ्या मारा असे मोदी यांनी सांगताच त्यांचे शब्द जिभेवर विरघळण्याआधीच मुसलमानी मोर्चाचा बॉम्ब फुटावा, हे कसले लक्षण समजायचे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे.
मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत आहेत. त्या मोर्चांतून प्रेरणा घेऊन मुसलमान समाजानेही त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढण्याचे ठरवले आहे. मुसलमानांनी मोर्चे काढावेत व आपल्या मागण्यांसाठी हैदोस घालावा हे काही आपल्या देशाला नवीन नाही. पण पंतप्रधान मोदी यांनी कोझीकोड येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलेल्या भाषणात मुस्लिमांना आपलेसे करण्याचा संदेश देताच मुसलमानांनी हिरव्या लुंग्या सावरून मोर्चाची तयारी करावी हा काय निव्वळ योगायोग समजावा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
‘हिंदुस्थानातील मुस्लिम जन हे आपलेच आहेत. त्यांच्याकडे भिन्न भावनेने बघू नका. त्यांना बळ द्या…’ असे मंत्रोच्चार करणार्या पंडित दीनदयाळ उपाध्यायांची भूमिका मोदी यांनी मांडली. मुसलमानांच्या खांद्यावर असे विश्वासाने डोके ठेवले जात असतानाच ‘आता आम्हीही मोर्चे काढणार. वातावरण तापवणार’ अशी घोषणा मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी करावी याचे आश्चर्य वाटते. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत व तेथे हिंदू व मुसलमान असे सरळ सरळ मतविभाजन होणार आहे. मुझफ्फरनगर दंगलीचा फायदा लोकसभेच्या वेळी भारतीय जनता पक्षास निश्चितच झाला व ऐतिहासिक विक्रमी असे यश भाजपच्या पदरात पडले. त्यामुळेच केंद्रात त्यांच्या बहुमताचा खुंटा बळकट झाला. याचा आम्हाला आनंदच आहे, पण आज अचानक मुस्लिमांच्या लांगूलचालनाची गरज या आमच्या मित्रमंडळींना का भासावी? असंही उद्धव ठाकरे यांनी विचारलं आहे.
मुसलमान म्हणजे फक्त मतांची एकगठ्ठा ‘पेढी’ नाही हे योग्यच आहे, पण हिंदूंची मते मिळवायची असतील तर मुसलमानांवर हल्ले-प्रतिहल्ले करणे हेसुद्धा राजकारण जोरात चालते व ते घातक आहे. मुसलमानांना आपलेसे करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी मुसलमानांना देशातील कायद्याची व संस्कृतीची जाणीव करून देण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी स्वीकारायला हवी असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
जो ‘वंदे मातरम्’चा गजर करील तो मुसलमान आपलाच आहे व या देशात असे लाखो मुसलमान आहेत ही भाग्याची गोष्ट आहे. पुन्हा कश्मीरातील जे मुसलमान ‘पाक झिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावीत आहेत, बुरहान वाणीसाठी शोक करीत आहेत अशा मुसलमानांनाही छातीशी कवटाळून आपले म्हणायचे काय? यावरही चिंतन किंवा मंथन झाले तर बरे होईल. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात एकप्रकारे जी इस्लामी राजवट यादवांनी सुरू केली आहे ती उलथवून तेथे प्रखर हिंदुत्ववादी राज्य यायला पाहिजे. पण असे प्रखर हिंदुत्ववादी आज उरले आहेत काय? असा रोख सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.