दलित चळवळीतील लेखक रामनाथ चव्हाण यांचे निधन
By Admin | Published: April 20, 2017 12:33 PM2017-04-20T12:33:04+5:302017-04-20T12:33:04+5:30
दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे आज सकाळी खाजगी रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20- दलित चळवळीतील आघाडीचे लेखक-संशोधक व नाटककार प्रा. रामनाथ चव्हाण यांचे आज सकाळी खाजगी रुग्णालयामध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे.
संशोधनपर लिखाण, नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. "भटक्या-विमुक्तांची जातपंचायत" हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. "जाती व जमाती" हेही त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. याचबरोबर भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीही त्यांची महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
भटक्या विमुक्तांचे जग व त्यांचे जीवन हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. तब्बल ३० वर्षाहून अधिक काळ त्यांनी या विषयासाठी अविचल निष्ठेने स्वतःला वाहून घेतले होते. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्टाबाहेर त्यांनी पदरमोड करून भरपूर भटकंती केली. भटक्या-विमुक्तांच्या पालावर, तांड्यांवर आणि वस्त्यांवर प्रत्यक्ष भटकून त्यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांच्या मुलाखतींतून, भटकंतीतील निरीक्षणांतून या जमातींविषयी भरपूर माहितीचे संकलन केले. भटक्या जमातींचे पूर्वेतिहास, त्यांच्या लोककथा, पुराणकथा, रूढी-परंपरा, देव-देवता, उत्सव, सण, विवाह संस्कार, काडीमोड व इतर न्यायनिवाडे, अंत्यविधी, व्यवसाय, भाषा, त्यांची जातपंचायत, काळानुसार या सगळ्यात झालेले बदल, त्यांचे प्रश्न याविषयी त्यांनी शक्य तितक्या तपशिलात माहिती गोळा केली.
त्याच विपुल माहितीतून त्यांचा "भटक्या-विमुक्तांची जातपंचायत" हा दस्तावेज पाच खंडात प्रसिद्ध झाला. भटक्या विमुक्तांचे वेगळे जग समजून घेण्यासाठी सर्वसामान्य वाचकांबरोबरच या विषयाच्या संशोधक-अभ्यासकांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मराठीतील हा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला. पुण्याच्या देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने हे खंड प्रकाशित केले आहेत.
२००२ साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या खंडात त्यांनी डवरी, गोसावी, कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, जोशी, डोंबारी, कैकाडी, वडारी, वंजारा, काकर, पारधी अशा ११ जमातींवर लिखाण केले आहे. २००४ साली प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या खंडात मातंग गारुडी, काशी कापडी, सिकलीकर, रजपूत भामटा, दसनाम गोसावी, गोपाळ, टकारी, घिसाडी, छप्परबंद अशा नऊ जमातीवर तर २००६ साली प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या खंडात नंदीबैलवाले, गाढवगोती बेलदार, रायरंद, मरीआईवाला, बहुरूपी, नाथपंथी रावळ या सहा जमातींवर लिखाण केले आहे.
२००८ साली प्रसिद्ध झालेल्या चौथ्या खंडात परदेशी भोई, मदारी, मसणजोगी, चित्रकथी, पाथरवट, घ्यारे कंजर, डक्कलवार अशा सात जमातीचा अभ्यास समाविष्ट असून अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पाचव्या खंडात दरवेशी, लोहार, तिरमल, बागडी, वेडूवाघरी, धनगर, गोंधळी, ओतारी आदी जमातीवर केलेला अभ्यास समाविष्ट आहे. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्या सहा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. पुणे विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. दलित चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.