रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यात "मातोश्री"वर जाणार नाहीत?
By Admin | Published: July 12, 2017 10:46 AM2017-07-12T10:46:32+5:302017-07-12T11:05:27+5:30
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे शनिवारी ( 15 जुलै ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, रामनाथ कोविंद हे ""मातोश्री""वर जाणार नाहीत.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे शनिवारी ( 15 जुलै ) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, रामनाथ कोविंद हे ""मातोश्री""वर जाणार नाहीत. त्यांच्या दौऱ्यासंबंधी जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये ""मातोश्री भेटी""चा उल्लेख करण्यात आलेला नाही.
रामनाथ कोविंद यांची एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. यावेळी शिवसेना वगळता एनडीएमधील सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
यामुळे मुंबई दौ-यावर येणारे रामनाथ कोविंद ""मातोश्री""वर जाणार का? यावर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही मातोश्रीभेटीचा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचे स्पष्ट आहे.
आणखी बातम्या वाचा
ठाकरेंची अनुपस्थिती
कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे टाळले होते. ही बाब भाजपाला खटकली होती. शिवाय ठाकरेंनी आपला प्रतिनिधी म्हणूनही कोणाला पाठविले नव्हते आणि हीच बाब भाजपा नेत्यांना सर्वात जास्त खटकली. एवढेच नाही तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनीही यावेळी संसद संकुलात उपस्थित राहणे टाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विमानाने दिल्लीला येणार होते. त्यांनी ठाकरेंना तुम्ही येणार असाल तर माझ्यासोबत येऊ शकता, असे सुचविले होते.
दरम्यान, याचा काहीही अर्थ काढू नये. आम्ही कोविंद यांचे नाव सुचविले असून, आम्ही त्यांना मतदान करणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती.
दरम्यान, कोविंद मुंबईत आल्यावर विमानतळावरुन ते थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. तर रामनाथ कोविंद हे सर्वच घटकपक्षांना भेटणार आहेत, असे भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. मात्र, मातोश्री भेटीसंदर्भात बोलण्यास त्यांनी टाळले.