रामनाथ कोविंद यांच्या निवडीमागे मोदी-शहांचे बेरजेचे राजकारण - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 22, 2017 08:05 AM2017-06-22T08:05:42+5:302017-06-22T08:05:42+5:30

शिवसेनेने एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी, यामागे भाजपाचे दलित मतांच्या बेरजेचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

Ramnath Kovind's choice behind politics - Uddhav Thackeray | रामनाथ कोविंद यांच्या निवडीमागे मोदी-शहांचे बेरजेचे राजकारण - उद्धव ठाकरे

रामनाथ कोविंद यांच्या निवडीमागे मोदी-शहांचे बेरजेचे राजकारण - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी, यामागे भाजपाचे दलित मतांच्या बेरजेचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. रामनाथ कोविंद यांची निवड व्हावी यामागे पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नक्कीच काहीतरी बेरजेचे राजकारण असावे. अर्थात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी अशा बेरजांचा खेळ नेहमीच होत आला आहे. त्यामुळे आता कोविंद यांच्या उमेदवारीची बेरीज भलेही नवी असेल, पण खेळ जुनाच असल्याचे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
कोविंद दलित आहेत व मतांच्या बेरजेसाठी बरे पडतील म्हणून त्यांची राष्ट्रपतीपदी निवड करणे हे ‘तत्त्व’ बरे नाही असे उद्धव यांनी म्हटले आहे.  कोविंद यांना राष्ट्रपती केल्याने देशातील दलित समाज व त्यांची ‘व्होट बँक’ भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला भरघोस फायदा होईल या बेरजेत श्री. कोविंद हे बसले असतील तर दलित मतांसाठी झालेले हे राजकारण देशाला आणखी कोणत्या खड्डय़ात ढकलणार आहे,  ही शंका लोकांच्या मनात असेल तर ती पुसून टाकावी लागेल असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीवरुन उद्धव यांनी भाजपावर निशाणा साधला असला तरी, कोविंद यांच्यावर कुठेही व्यक्तीगत टीका केलेली नाही. कोविंद हे उत्तम माणूस आहेत. कायद्याचे ज्ञानी आहेत. अशा एका सामान्य माणसाला राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याचा मान मिळत असेल तर तो देशातील गांजलेल्या गरीब कष्टक-यांचा सन्मान आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 
- रामनाथ कोविंद यांची निवड व्हावी यामागे पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नक्कीच काहीतरी बेरजेचे राजकारण असावे. अर्थात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी अशा बेरजांचा खेळ नेहमीच होत आला आहे. त्यामुळे आता कोविंद यांच्या उमेदवारीची बेरीज भलेही नवी असेल, पण खेळ जुनाच आहे. कोविंद हे योग्य व कर्तबगार आहेत. देशाच्या संविधानाचे ते रक्षण करतील म्हणून त्यांना राष्ट्रपती करायलाच हवे ही भूमिका आम्हास मान्य आहे, पण ते फक्त दलित आहेत व मतांच्या बेरजेसाठी बरे पडतील हे ‘तत्त्व’ बरे नाही.
 
-  रामनाथ कोविंद हे देशाचे चौदावे राष्ट्रपती होतील. शिवसेनेनेही श्रीमान कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे एन.डी.ए.च्या मतांत फाटाफूट होईल अशी शंका घेणाऱयांच्या तोंडात बोळा बसला असेल. रामनाथ कोविंद कोण? असा प्रश्न सुरुवातीला भाजपातील काही मंडळी वगळता संपूर्ण देशालाच पडला होता व त्या प्रश्नाचे उत्तर आजही शोधले जात असले तरी राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱया व्यक्तींविषयी फारशी टीकाटिपणी करू नये असे संकेत आहेत. श्री. कोविंद हे लोकनेते किंवा राष्ट्रीय पुरुष नक्कीच नव्हेत. डॉ. अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे त्यांनी एखाद्या क्षेत्रात महान कामगिरी बजावल्याचीही नोंद नाही. श्री. कोविंद हे भारतीय जनता पक्षाच्या दलित राष्ट्रीय मोर्चाचे अध्यक्ष होते. ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत व मोदींचे राज्य आल्यावर कोविंद यांना बिहारचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले. कोविंद यांच्या गाठीशी हा इतका अनुभव आहे व त्यापेक्षा मोठा अनुभव, लोकप्रियता, राष्ट्रीय चातुर्य असलेल्या अनेकांची नावे राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होती. असे असताना श्री. कोविंद यांची निवड व्हावी हा त्यांचा दैवयोग आहे आणि त्यांच्याकडून आणखी मोठे काम करून घ्यायचे नियतीच्या मनात असावे. 
 
- राज्यसभा व लोकसभेत चार-पाच वेळा ‘मेंबर’ झालेल्या, संघर्ष व त्याग केलेल्या, आपल्या राजकीय चातुर्याने जनमानसावर छाप पाडणाऱ्या नेत्यांना मागे सारून श्री. रामनाथ कोविंद यांची निवड व्हावी यामागे पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नक्कीच काहीतरी गणित किंवा बेरजेचे राजकारण असावे. कोविंद यांना राष्ट्रपती केल्याने देशातील दलित समाज व त्यांची ‘व्होट बँक’ भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला भरघोस फायदा होईल या बेरजेत श्री. कोविंद हे बसले असतील तर दलित मतांसाठी झालेले हे राजकारण देशाला आणखी कोणत्या खड्डय़ात ढकलणार आहे,  ही शंका लोकांच्या मनात असेल तर ती पुसून टाकावी लागेल. अर्थात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी अशा बेरजांचा खेळ नेहमीच होत आला आहे. त्यामुळे आता कोविंद यांच्या उमेदवारीची बेरीज भलेही नवी असेल, पण खेळ जुनाच आहे. कोविंद हे योग्य व कर्तबगार आहेत. देशाच्या संविधानाचे ते रक्षण करतील म्हणून त्यांना राष्ट्रपती करायलाच हवे ही भूमिका आम्हास मान्य आहे, पण ते फक्त दलित आहेत व मतांच्या बेरजेसाठी बरे पडतील हे ‘तत्त्व’ बरे नाही.
 
- मग त्या तत्त्वात श्री. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार अधिक योग्य बसतात व काँग्रेसने जो अन्याय डॉ. आंबेडकरांवर केला तो धुऊन काढण्याची संधीच सध्याच्या राज्यकर्त्यांना मिळाली असती. श्री. नरेंद्र जाधव, भालचंद्र मुणगेकर किंवा रामदास आठवले यांचे नावही या चौकटीत नीट बसत असावे. दलित बांधवांमध्येही जातीची लेबले फेकून देत कर्तबगारी गाजवणाऱया गरुड व चित्त्यांची कमतरता नाही. श्री. रामनाथ कोविंद हेदेखील संघर्षातून व कष्टातून इथपर्यंत पोहोचले आहेत. म्हणूनच ऊठसूट ते फक्त दलित वगैरे आहेत असे सांगून दलित मतांस तरतरी आणण्याचे कारण नाही. कोविंद हे उत्तम माणूस आहेत. कायद्याचे ज्ञानी आहेत. अशा एका सामान्य माणसाला राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याचा मान मिळत असेल तर तो देशातील गांजलेल्या गरीब कष्टकऱयांचा सन्मान आहे. राष्ट्रपती हे देशाच्या तीनही सेनादलांचे प्रमुख असतात. आज देशाच्या सीमांची व सामान्य माणसांची स्थिती बरी नाही. राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद हे सर्व बदलू शकणार असतील तर इतिहासात त्यांचे मानाचे पान सदैव राहील. शिवसेनेने श्री. कोविंद यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या तोंडात मूळव्याध उपटली आहे. शिवसेनेने कोविंद यांना पाठिंबा दिलाच कसा? यावर काहीजण आपटून आपटून स्वतःचीच चपटी करून घेत असतील तर ती त्यांची मजबुरी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह आम्ही शेवटपर्यंत धरला. सरसंघचालक नसतील तर कृषी क्षेत्रातील अर्थतज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचे नाव सुचवले. पण शेवटी ज्यांच्या हाती बहुमताचे व सत्तेचे सुकाणू असते तेच आपल्या मनाप्रमाणे पत्ते फेकत असतात व बुद्धिबळाची प्यादी हलवत असतात. इतर सर्वजण सत्तेपुढे शेपटय़ा हलवीत असताना शिवसेनेत भूमिका सडेतोडपणे मांडण्याचे स्वातंत्र्य, हिंमत व स्वाभिमान कायम आहे. ज्यांच्या जिभा व तोंडे कायम वाकडीच असतात त्यांना स्वाभिमानी बाण्यात ‘यू टर्न’ वगैरे दिसत असेल तर त्यांच्या खोपडय़ांची दुरुस्ती करावीच लागेल. तुम्ही फक्त भांडत राहा, आम्ही फुकटात टाळय़ा वाजवतो, असे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग झाला असेल तर त्यांनी स्वतःला सावरायला हवे.

Web Title: Ramnath Kovind's choice behind politics - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.